नागपूर : धंतोली व रामदासपेठ येथील रुग्णालयांनी पार्किंगच्या जागेवर केलेले अतिक्रमण व अवैध बांधकाम हटविण्यासाठी थातूरमातूर कारवाई करण्यात आल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी महानगरपालिकेची कानउघाडणी केली.तसेच, आयुक्तांना येत्या सोमवारी न्यायालयात हजर राहण्याचे व यावर स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले.
यासंदर्भात धंतोली नागरिक मंडळाने जनहित याचिका दाखल केली आहे.त्यावर न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व अभय मंत्री यांच्यासमक्ष सुनावणी झाली.गेल्या तारखेला न्यायालयाने संबंधित कारवाईचा अहवाल मागितला होता.त्यामुळे मनपाने कारवाईची माहिती देण्यासह छायाचित्रेही न्यायालयात सादर केली.त्या छायाचित्रांवरून मनपाने थातूरमातूर कारवाई केल्याचे व या कारवाईमुळे पार्किंगची जागा मोकळी झाली नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले.परिणामी, न्यायालयाने मनपाची चांगलीच कानउघाडणी केली व आयुक्तांना लगेच बोलावण्यास सांगितले.परंतु, आयुक्त मुंबईला असल्याचे कळल्यानंतर प्रकरणावर येत्या सोमवारी सुनावणी निश्चित करण्यात आली.त्यावेळी मनपा आयुक्तांना न्यायालयात हजर राहून स्पष्टीकरण द्यावे लागेल.
धंतोली व रामदासपेठ येथे गल्लोगल्ली रुग्णालये उघडण्यात आली असून अनेक रुग्णालयांच्या संचालकांनी पार्किंग व इतर नियमांची पायमल्ली केली आहे.कायद्यानुसार प्रत्येक इमारतीमध्ये पार्किंगसाठी जागा राखीव ठेवणे आवश्यक आहे.रुग्णालय संचालकांनी इमारतींचे आराखडे मंजूर करून घेताना पार्किंगसाठी राखीव जागा दाखविली आहे.त्यानुसार इमारतीही बांधल्या आहेत.परंतु, प्रत्यक्षात पार्किंगची जागा दुसऱ्याच गोष्टीसाठी उपयोगात आणली जात आहे.काही रुग्णालयांनी पार्किंगच्या जागेवर स्वागतकक्ष, चौकशी कक्ष व रुग्ण नोंदणी कक्ष थाटले आहे तर, अनेक रुग्णालयांमधील पार्किंगची जागा रुग्णांच्या नातेवाइकांना थांबण्यासाठी उपयोगात आणली जात आहे.तसेच, पार्किंगसाठी थोडीफार वाचवून ठेवलेली जागा रुग्णालयांचे कर्मचारी वाहने ठेवण्यासाठी वापरत आहेत.त्यामुळे रुग्णांना भेटण्यासाठी येणारे व्यक्ती रोडवर वाहने उभी ठेवतात.परिणामी, परिसरात ठिकठिकाणी वाहतूक खोळंबते.याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड.आशुतोष धर्माधिकारी व ॲड.अश्विन देशपांडे यांनी कामकाज पाहिले.
अवमानाच्या मुद्यावरही विचार केला जाईलधंतोली व रामदासपेठ येथे वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे गेल्या एप्रिलपासून किती वाहनचालकांवर कोणती कारवाई करण्यात आली, याची माहिती रेकॉर्डवर सादर न केल्यामुळे वाहतूक पोलिस उपायुक्तांना गेल्या तारखेला अवमान कारवाईची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.पुढच्या तारखेला हा मुद्दाही विचारात घेतला जाईल.