नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जमिनीवरील अतिक्रमणावर १८ दिवसांनी परत एकदा हातोडा चालला. ‘कॅम्पस’ला लागून असलेल्या विद्यापीठाच्या जागेवरील चार ढाब्यांना मंगळवारी पाडण्यात आले. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आता येथील सुमारे चार एकर जागेवरील अतिक्रमण प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे कायम आहे. विद्यापीठाच्या मालकीच्या या जमिनीवर गेल्या अनेक वर्षांपासून विविध भोजनालय तसेच ढाबेमालकांनी अतिक्रमण केले आहे. यातील एका ढाब्यावर व गॅरेजवर २८ जानेवारी रोजी प्रशासनाने कारवाई केली होती व पाऊण एकर जागेने मोकळा श्वास घेतला होता. इतर ढाबेवाले न्यायालयात गेले होते. सोमवारी याबाबतीत यथास्थिती ठेवण्याचे दिवाणी न्यायालयाने अंतरिम आदेश दिले होते. यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करण्याची ग्वाही राज्य शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली होती. परंतु या ढाबेचालकांनी विविध दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. जर दिवाणी न्यायालयाने अतिक्रमण न पाडण्याचे निर्देश दिले असतील तर त्यांचे पालन करणे आवश्यक आहे. परंतु जर असा कुठला निर्देशच नसेल तर संबंंधित अतिक्रमण पाडले जाऊ शकते, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले होते. मंगळवारी आलेल्या दिवाणी न्यायालयाच्या निर्देशानंतर झालेल्या ‘अतिक्रमण हटाओ’च्या कारवाईमध्ये मेजबान हॉटेल, फोर सिझन हॉटेल, एम सावजी हॉटेल व देवाशीस यादव यांच्या जागेचा समावेश होता. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव पुरण मेश्राम व इतर अधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला हॉटेल मालकांना सामान काढण्यासाठी वेळ देण्यात आला. यावेळी अतिक्रमण विरोधी पथकातील कर्मचाऱ्यांसोबत ढाबेचालकांनी वाद घातला. स्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यानंतर सुमारे एका हेक्टरवरील अतिक्रमण तोडण्यात आले व ही जमीन विद्यापीठ प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आली. (प्रतिनिधी)खासगी सुरक्षा रक्षक तैनात४गेल्या महिन्याभरात झालेल्या दोन अतिक्रमण कारवाईमध्ये विद्यापीठाची सुमारे सव्वाहेक्टर जागा मोकळी झाली आहे. उर्वरित जागेवर अद्यापही अतिक्रमण कायम आहे. परंतु मोकळ्या जागेवर कुणी परत अतिक्रमण करू नये यासाठी विद्यापीठाने तेथे २० सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत, अशी माहिती कुलसचिव पूरण मेश्राम यांनी दिली.ढाबेचालकांना पुढील याचिकेसाठी वेळच दिला नाही४मंगळवारी दिवाणी न्यायालयाने यासंदर्भातील चार ढाब्यांवरील अतिक्रमण पाडण्यावर असलेली स्थगिती उठवली. सकाळी ११ वाजता हा आदेश आला. या ढाबेमालकांना परत याचिका करण्यासाठी वेळ न देता प्रशासनाने तातडीने कारवाईला सुरुवात केली. याअगोदर विद्यापीठ व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांची अगोदरच चर्चा झाली होती. त्यानुसार नागपूरचे तहसीलदार सतीश समर्थ यांच्या नेतृत्वात मनपा व नासुप्रच्या पथकाने ही कारवाई केली. नासुप्रचे अधिकारी राजू पिंपळे, अनिल अवस्थी, संदीप राऊत यांच्या नेतृत्वातील पथक सकाळीच पोहोचले होते.
विद्यापीठाच्या अतिक्रमणावर ‘हातोडा’
By admin | Published: February 17, 2016 3:09 AM