आशीष दुबे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लाखो युवकांचे स्वप्न सिव्हील सेवेत जाण्याचे असते. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते दिवसरात्र मेहनत घेतात. पदवी पूर्ण झाल्यानंतर आत्मविश्वासाने युपीएससीच्या परीक्षेत सहभागी होतात. परंतु एक-दोन प्रयत्नानंतर अपयश आल्यास, ते निराश होतात, हताश होऊन ही परीक्षा आपल्याला शक्य नाही, अशी धारणा त्यांच्यात निर्माण होते.शुक्रवारी युपीएससीच्या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला. यशस्वी उमेदवारांनी आनंद साजरा केला. या दरम्यान गुणवंत विद्यार्थ्यांनी लोकमतशी आपले अनुभव शेअर केले. त्यांनी युपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र देताना सांगितले की, अपयश आल्यानंतही हिंमत हरू नका. उलट आणखी आत्मविश्वासाने तयारी करा. अपयशाला यशाची शिडी बनवा. अपयश का आले याचे विश्लेषण करा, आपल्या कमजोरीवर फोकस करा, असे केल्याने यश नक्कीच मिळेल.अपयशानंतर वाटले यश मिळू शकतेअभिलाषा अभिनवने नागरी सेवा परीक्षेत १८ वी रँकिंग प्राप्त केले आहे. मुंबईच्या एका अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी.टेक. केले. यानंतर तिने एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी केली. दरम्यान नागरी सेवा परीक्षा देण्याचा तिने निर्णय घेतला. तिचे वडील सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी आहे. त्यामुळे लहानपणापासूनच तिची ही इच्छा होती. परंतु पहिल्या प्रयत्नात ती यशस्वी ठरू शकली नाही. यश न मिळाल्याचे तिला दु:ख झाले नाही. परीक्षा फार कठीण नाही, यात यश मिळविता येऊ शकते, असे तिला जाणवले. अभ्यासासाठी वेळ मिळत नव्हता. त्यामुळे तिने नोकरीचा राजीनामा दिला. २०१५ मध्ये ती एका राष्ट्रीयकृत बँकेत अधिकारी म्हणून रुजू झाली. यादरम्यान तिने पुन्हा नागरी सेवा परीक्षा दिली. दुसऱ्या प्रयत्नात तिला ३०८ रँक मिळाली. तिसऱ्या प्रयत्नात ज्या विषयात कमी गुण मिळाले त्यावर अधिक लक्ष दिले. मागच्या चुका यावेळी होणार नाही असा निश्चय केला आणि परिणाम मिळाला.पहिल्या प्रयत्नात मिळाले अपयशसिव्हील सेवा परीक्षेत १२ वी रँक मिळविलेल्या आशिमा मित्तलने आयआयटी मुंबई येथून बी. टेकचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी सांगितले की, त्या पहिल्या प्रयत्नात अपयशी झाल्या होत्या. परंतु तरी त्यांनी मनोधैर्य खचू दिले नाही. अभ्यास सुरु ठेवला. दुसऱ्या प्रयत्नात ३२८ वी रँक मिळविली. यापेक्षाही चांगले प्रदर्शन करता येऊ शकते हा मनात आत्मविश्वास होता. त्यामुळे मागील निकाल विसरुन पुन्हा नव्या जोमाने तयारी केली. तयारी दरम्यान ज्या विषयात गुण कमी मिळाले त्या विषयावर अधिक लक्ष केंद्रित केले. त्यामुळे यावेळी १२ वी रँक मिळाली. चांगली रँक मिळाल्यापेक्षा ही आनंदाची बाब आहे की ज्यामुळे सिव्हील सेवा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला होता ते मनातील स्वप्न आता पूर्ण करता येईल. हे स्वप्न म्हणजे सर्वसामान्य नागरिकांची सेवा करून शासकीय योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचविणे होय.अनुशासन आणि प्रामाणिकता आवश्यकनागरी सेवा परीक्षेत २७३ रँक प्राप्त करणाऱ्या ब्रिजशंकरने सांगितले की, मनासारखे यश संपादन करण्यासाठी अनुशासन आणि प्रामाणिकपणे प्रयत्न आवश्यक आहे. यामुळे एकाग्रता कायम राहते. लक्ष्य समोर असते. परीक्षेची तयारी करीत असताना कोणत्याही पद्धतीची नकारात्मक भावना मनात येता कामा नये. अभ्यास करताना स्टडी मटेरियल काय आहे, हे महत्त्वाचे असते. चांगल्या स्टडी मटेरियलचा संग्रह आवश्यक आहे. एकेक करीत सर्वांचाच अभ्यास करावा.समर्पण आवश्यकरितेश भटने नागरी सेवा परीक्षेत ३०२ वी रँक प्राप्त केली आहे. त्यांनी सांगितले की, परीक्षेच्या तयारीसाठी मजबूत इच्छाशक्ती आणि समर्पण आवश्यक आहे. मजबूत इच्छाशक्तीमुळे तयारी करीत असताना दुसरीकडे लक्ष जात नाही. मनात सकारात्मक भाव राहतात. स्वत:वरील विश्वास कायम राहतो. समर्पण असल्याने कधीही अपयश येत नाही. अपयश आले तरी हताश होत नाही. याशिवाय तयारी करीत असताना मित्रांसह आणि विषयांच्या तज्ञांसह चर्चा करावी. त्यांना आपल्यातील कमतरतेबद्दल सांगावे. ते दूर कसे करता येईल, याकडे लक्ष द्यावे.