लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धार्मिक उत्सवांचे देखावे लोकांना कायमच आकर्षक वाटतात. सध्या चर्चा आहे ती रामदासपेठेत राहणाऱ्या जयश्री गिरीराज सिंघी यांनी साकारलेल्या देखाव्याची. त्यांनी कारगील आणि लेह-लडाखच्या नयनरम्य भूमीवर बाल श्रीकृष्ण विराजमान असलेले दृश्य साकारले आहे. त्यांच्या सुंदर कल्पकतेने साकारलेला जन्माष्टमीचा देखावा पाहणाऱ्यांच्या नजरेत भरत आहे.जयश्री सिंघी यांना वेगवेगळ्या प्रकारचे दृश्य तयार करण्याचा छंद आहे. गणेशोत्सव असो, ख्रिसमस किंवा स्वातंत्र्यदिन, अशा कोणत्याही प्रसंगी किंवा उत्सवाच्या काळात त्या क्षणाचे कल्पक रूप देून पाने, फुले, पेपर, थर्माकोल व टाकाऊ पदार्थांपासून दृश्य साकारण्याची त्यांना आवड. त्यांची कल्पकता इतकी आकर्षक असते की पाहणारा थक्क झाल्याशिवाय राहत नाही. याच कल्पनाविलासातून यावेळी त्यांनी जन्माष्टमीचा आकर्षक देखावा साकारला आहे. विशेष म्हणजे, गेल्याच महिन्यात त्या कुटुंबासोबत काश्मीर भागातील कारगील व लेह, लडाखला पर्यटनासाठी गेल्या होत्या. यावेळी भगवंताला सोबत नेऊ न शकल्याची खंत त्यांच्या मनात होती. घरी आल्यानंतर ही हुरहूर मनात होती. दरम्यान, जन्माष्टमी उत्सवाची संधी त्यांना मिळाली. श्रीकृष्णाला नेऊ शकले नाही म्हणून तेथील दृश्यात कृष्णरूप साकार करावे, या कल्पनेतून हा देखावा साकार झाल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.वाखाणण्यासारखी बाब म्हणजे या संपूर्ण परिसराचे हुबेहुब दृश्य त्यांनी साकारले आहे. कारगीलमध्ये ज्या ठिकाणी युद्ध झाले होते तेथील परिस्थिती, आर्मी कॅम्प, तेथे उभे असलेले फायटर प्लेन, नुब्रा व्हॅली, येथून वाहणारी नदी, उंट सफारीचे दृश्य, जगातील सर्वात उंच खारदुमला पॉर्इंट, येथून जाताना लडाखमधील बुद्धिस्ट मॉनेस्ट्रीचा संपूर्ण परिसर, तेथे चालणारी ध्यानसाधना, पॅनगांग लेक, लेह मार्केट असा संपूर्ण परिसर आपल्या डोळ्यासमोरून जातो आणि आपण हे सर्व प्रत्यक्ष पाहत आहोत, असा भास पाहणाºयाला होतो. या नयनरम्य अशा ठिकाणी जयश्री यांनी झुल्यावर बाल श्रीकृष्णाची मूर्ती सजविली आहे. हे दृश्य साकारण्यासाठी त्यांनी फुलांच्या पाकळ्या, पाने, कार्टबोर्ड, कापूस, धान्याचा भुसा, थर्माकोल, पेपर आदी साहित्याचा उपयोग केला आहे. त्यामुळे हा देखावा अजूनच आकर्षक ठरला असून तो नजर रोखून पाहावा, असे वाटते.राजस्थानी महिला मंडळातर्फे होणाऱ्या कार्यक्रमात महिलांना देखावे साकारण्याची व सजावटीचे प्रशिक्षण देणे, महापालिकेच्या मुलांच्या कॅम्पमध्ये मार्गदर्शन करणे, अशा विविध सामाजिक कामात त्यांचा सक्रिय सहभाग राहतो. यास्थितीत वेळ काढून स्वत:च्या कल्पनेतून अशी दृश्य साकारणे, ही बाब नक्कीच प्रेरक आहे. नंदोत्सव सुरू असेपर्यंत त्यांच्या घरी हा देखावा साकारलेला राहणार आहे. त्यानंतर तो हटविताना मन खिन्न होत असल्याची भावना जयश्री यांनी सांगितली. मग त्या पुन्हा नव्या देखाव्याच्या तयारीला लागतात. कोणताही छंद आयुष्यात आनंद देतो म्हणतात, ते हेच.