नागपूर : महात्मा गांधी यांची ओळख असलेल्या चरख्याच्या आकाराची सर्वांना कल्पना आहे. मात्र नागपूरच्या एका कलावंताने अगदी सूक्ष्म आकाराचा चरखा बनविला आहे आणि त्यावर सूतही कातता येते. अगदी बाेटाच्या ठशावर येणारा ३.२० मिलिमीटर लांब, २.६८ मिमी रुंद, ३.०६ मिमी उंच आणि अवघ्या ४० मिलिग्रॅम वजनाचा हा चरखा नागपूरच्या जयंत तांदुळकर या कलावंताने बनविला आहे. या चरख्याची नुकतीच लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकार्डमध्ये नाेंद झाली आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी चरख्यावर सूत कातत स्वदेशीचा नारा दिला हाेता. हा चरखा राष्ट्रीय भावनेचे प्रतीक ठरले आहे. हा चरखा तुम्ही पाहिला आहे आणि त्याच्या आकाराची सर्वांना कल्पनाही आहे. स्वावलंबी भारताच्या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी काहीतरी विशेष प्रयत्न म्हणून तांदुळकर यांनी हा चरखा तयार केला आहे. जयंत तांदुळकर हे झिंगाबाई टाकळी येथील रहिवासी असून महालेखाकार कार्यालयात वरिष्ठ लेखापाल या पदावर कार्यरत आहेत. तांदुळकर यांना वेगवेगळ्या कलाकृती साकारण्याचा छंद आहे. या छंदातूनच त्यांनी हा चरखा तयार केला. यासाठी लहान लाकडी काड्या, स्टील तार आणि कापूस धागा इत्यादी वस्तूंचा वापर केला आहे. वैशिष्ट्य म्हणजे, एवढ्या लहान आकाराचा चरखा असूनही त्यावर सूत कातण्याचे कार्य करता येते.
या चरख्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स २०२१ आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये २०२२ मध्ये नाेंद झाली आहे आणि आता २०२३ ला लिम्का बुक ऑफ रेकॉर्डनेही नेांद घेत प्रमाणपत्र दिले आहे.
एक इंचाची भगवद्गीता अन् बरेच साहित्य
तांदुळकरांनी काचेच्या बाटलीच्या आत खाट, पेन स्टँड, मॅच बॉक्स आदी अनेक प्रकारच्या कलाकृती बनवल्या आहेत. याशिवाय लहान बैलबंडी, बैलगाडा, टांगा, सोफासेट, टेबल खुर्ची आदी वस्तूंच्या लहान मिनियचर प्रतिकृती लाकडाद्वारे बनवल्या आहेत. अगदी एक इंच बाय अर्धा इंच आकाराची भगवद्गीतादेखील त्यांनी बनवली आहे. त्यांची ही कलात्मकता शहरात चर्चेचा विषय ठरली आहे.