नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील बहुचर्चित मोनू गेडाम हत्याकांड प्रकरणामधील दोन आरोपींना जामीन नाकारला. न्यायमूर्तीद्वय विनय जोशी व वृषाली जोशी यांनी हा निर्णय दिला.
श्याम मनोहर कुंडवाणी (२०) व घनश्याम ऊर्फ रोशन रमेश भाजणे (२०) अशी आरोपींची नावे आहेत. ही घटना १२ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास घडली. घटनेच्या काही दिवसांपूर्वी एका मुलीवरून मोनू व आरोपी रोशनचा वाद झाला होता. त्यामुळे रोशन व श्यामसह इतर दोन-तीन अल्पवयीन आरोपींनी मोनूचा खून करण्याचा कट रचला. त्याकरिता आरोपींनी मोनूला घेरले.
दरम्यान, मोनूने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण आरोपींनी त्याला पकडले व त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले. परिणामी, मोनू जागीच ठार झाला. वैद्यकीय तपासणीत मोनूच्या शरीरावर २२ गंभीर घाव आढळून आले. सुरुवातीला सत्र न्यायालयाने या आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला होता. करिता त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयानेही घटनेतील क्रूरता व इतर कायदेशीर बाबी लक्षात घेता आरोपींना दणका दिला.