सरकारी कर्मचाऱ्यांची खाती अॅक्सिस बँकेत वळवली, फडणवीसांना कोर्टाची नव्याने नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2022 03:50 PM2022-01-06T15:50:18+5:302022-01-06T16:03:46+5:30
नागपूर खंडपीठाने सरकारी कर्मचाऱ्यांची खाती अॅक्सिस बँकेत वळवल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस व स्टेट बँक ऑफ इंडियाला नोटीस बजावली आहे.
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) व स्टेट बँक ऑफ इंडियाला (State Bank of India) नोटीस बजावली आहे. महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांची बँक खाती अॅक्सिस बँकेत (Axis Bank) वळवल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली असून चार आठवड्यांत उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सुनील शुक्रे आणि अनिल पानसरे यांच्या खंडपीठाने ही नोटीस बजावली. फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या अॅक्सिस बँकेत नोकरीला आहेत. मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी पदाचा गैरवापर करुन सरकारी कर्मचाऱ्यांचे खाते इतर बँकांमधून अॅक्सिस बँकेत वळवल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.
मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी त्यांच्या आदेशानुसार राज्याच्या मुख्य सचिवांनी परिपत्रक काढून सरकारी कर्मचाऱ्यांची एसबीआय व इतर राष्ट्रीयीकृत बँकांमधील खाती अॅक्सिस बँकेत वळती करण्याचा आदेश दिला होता, असा आरोप करणारी जनहित याचिका मोहनीश जबलापुरे यांनी हायकोर्टात दाखल केली होती. या प्रकरणी त्यांना आधीही नोटीस बजावण्यात आली होती पण, तोपर्यंत त्यांचा राहण्याचा पत्ता बदलला. याप्रकरणी बुधवारी त्यांना नव्याने नोटीस बजावण्यात आली आहे.