नागपूर : चहा व पान टपरीच्या जागेवरून वाद झाल्यानंतर तीन मित्रांचा शहाळे कापण्याच्या सत्तूरने निर्घृण खून केल्यामुळे सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेला नररुपी सैतान राजू छन्नूलाल बिरहा (५५) याला मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने तीन सरकारी साक्षीदारांची उलटतपासणी घेण्याची संधी दिली आहे.
संबंधित साक्षीदारांमध्ये तपास अधिकारी विलास वांदीले, वोडाफोन कंपनीचे नोडल अधिकारी अंजुम दिलावर नाईकवाडे व केमिकल ॲनालायझर तुषार विष्णू पवार यांचा समावेश आहे. बिरहाला काही कारणांमुळे सत्र न्यायालयामध्ये या तिघांची उलटतपासणी घेता आली नाही. परिणामी, आरोपीविरुद्ध पारदर्शीपणे खटला चालविण्याचे तत्व बाधित झाले. करिता, उच्च न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता ही प्रक्रिया सत्र न्यायालयाऐवजी स्वत:समक्षच पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी खटल्यावर येत्या ६ जुलै रोजी दुपारी २.३० वाजता सुनावणी निश्चित करण्यात आली आहे.
सत्र न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेवर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब करणे आवश्यक आहे. त्यामुळे हा खटला उच्च न्यायालयासमक्ष सादर करण्यात आला आहे. खटल्यावर सोमवारी न्यायमूर्तिद्वय विनय जोशी व वाल्मिकी मेनेझेस यांच्यासमक्ष सुनावणी झाली. सरकारच्या वतीने अनुभवी ॲड. संजय डोईफोडे तर, आरोपीतर्फे ॲड. सुमित जोशी यांनी कामकाज पाहिले.
२०१५ मधील घटना
समाजाला हादरवून सोडणारी ही घटना १७ नोव्हेंबर २०१५ रोजी सकाळी १० च्या सुमारास वागदरा शिवार, ता. हिंगणा येथे घडली. मृतांमध्ये सुनील हेमराज कोटांगळे (३१), आशिष ऊर्फ गोलू लहुभान गायकवाड (२६) व कैलाश नारायण बहादुरे (३२) यांचा समावेश आहे. आरोपी राजू बिरहाने अत्यंत क्रूर व अमानवीय पद्धतीने हा गुन्हा केला.