शोमा सेनना पाच लाख अदा करण्याचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 10:56 AM2020-08-14T10:56:56+5:302020-08-14T10:57:18+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सेवानिवृत्त इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. शोमा सेन यांना सेवानिवृत्तीनंतरच्या लाभांतील पाच लाख रुपये अदा करण्याचा राज्य सरकारला आदेश दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सेवानिवृत्त इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. शोमा सेन यांना सेवानिवृत्तीनंतरच्या लाभांतील पाच लाख रुपये अदा करण्याचा राज्य सरकारला आदेश दिला. त्याकरिता सरकारला सात दिवसांचा वेळ देण्यात आला.
प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व नितीन सूर्यवंशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. प्रा. सेन ३१ जुलै २०१८ रोजी सेवानिवृत्त झाल्या. त्यानंतर नागपूर विद्यापीठाने त्यांना देय असलेल्या विविध लाभांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला नाही. परिणामी, त्यांचे सर्व लाभ रखडले. त्यासंदर्भात त्यांनी राज्य सरकार व नागपूर विद्यापीठाला अनेकदा निवेदने सादर केली, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. शेवटी त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता वरील आदेश दिला. बुधवारी सेन यांना तात्पुरते निवृत्तिवेतन सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले होते. सेन यांच्यातर्फे अॅड. प्रकाश मेघे यांनी कामकाज पाहिले.