नागपूर : वुडबॉल खेळाडू रोहित नांदूरकर व मिनी गोल्फ खेळाडू पवन डोईफोडे यांना राष्ट्रीय विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत प्रवेश देण्यावर निर्णय घ्या, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरूंना दिला आहे. या स्पर्धेला १ मार्चपासून सुरुवात होणार आहे.
दोन्ही खेळाडूंनी राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे. असे असताना त्यांना राष्ट्रीय विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. अमरावती विद्यापीठात क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळ नसल्यामुळे खेळाडूंवर अन्याय झाला, असा आरोप याचिकेत करण्यात आला होता.
न्यायालयाने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यामधील कलम १२ (७) अनुसार या खेळाडूंच्या तक्रारीवर कुलगुरूही निर्णय घेऊ शकतात, ही बाब लक्षात घेता सदर आदेश दिला व खेळाडूंची याचिका निकाली काढली. याचिकेवर न्यायमूर्तिद्वय सुनील शुक्रे व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. मोहन सुदामे यांनी बाजू मांडली.