नागपूर : राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या आणि संपूर्ण राज्याला हादरविणाऱ्या बहुचर्चित आर्किटेक्ट एकनाथ निमगडे हत्याकांडाच्या तपासाचा सर्वसमावेशक अहवाल सादर करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने सोमवारी केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) संस्थेला दिला. याकरिता, संस्थेला २५ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली.
या प्रकरणाचा तपास वेगात पूर्ण होऊन आरोपींना कडक शिक्षा व्हावी याकरिता एकनाथ निमगडे यांचा मुलगा अनुपम निमगडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तिद्वय विनय जोशी व भारत देशपांडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. ही घटना ६ सप्टेंबर २०१६ रोजी सकाळी ८ च्या सुमारास सेंट्रल एव्हेन्यूवरील लाल इमली चौकात घडली होती. मॉर्निंग वॉक करून घरी परतत असताना निमगडे यांची बंदूकीच्या ५ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. वर्धा मार्गावरील साडेपाच एकर जमिनीच्या वादातून निमगडे यांची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे. या जमिनीचा वाद दिवाणी न्यायालयात सुरू आहे. सीबीआयतर्फे ॲड. मुग्धा चांदूरकर यांनी कामकाज पाहिले.