हायकोर्ट : तीन आरोपींना प्रत्येकी एक लाख रुपये दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 07:53 PM2019-04-27T19:53:05+5:302019-04-27T19:54:09+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ४५ किलो गांजा बाळगणाऱ्या तीन आरोपींना सात महिने कारावास व प्रत्येकी एक लाख रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास, अशी सुधारित शिक्षा सुनावली. न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांनी हा निर्णय दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ४५ किलो गांजा बाळगणाऱ्या तीन आरोपींना सात महिने कारावास व प्रत्येकी एक लाख रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास, अशी सुधारित शिक्षा सुनावली. न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांनी हा निर्णय दिला.
मनकर्णा मोहन जाधव (५०), पंचफुला बाबुराव शिंदे ऊर्फ वंजारी (६०) व उदयभान सीताराम धोंगडे (५०), अशी आरोपींची नावे आहेत. हे प्रकरण वर्धा जिल्ह्यातील आहे. २ सप्टेंबर २००३ रोजी मध्यरात्री वर्धा पोलीस पेट्रोलिंग करीत असताना त्यांना हे तीन आरोपी सेवाग्राम रेल्वे स्टेशनजवळ संशयास्पदरीत्या उभे असलेले आढळून आले. झडती घेतल्यानंतर त्यांच्याकडे एकूण ४५ किलो ५४५ ग्रॅम गांजा आढळून आला. सत्र न्यायालयाने या आरोपींना पाच वर्षे कारावास व प्रत्येकी ४० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. त्याविरुद्ध त्यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता, आरोपींचे अपील अंशत: मंजूर केले व सत्र न्यायालयाच्या निर्णयात बदल करून कारावासाची शिक्षा कमी केली आणि दंड वाढवला. आरोपींतर्फे अॅड. राजेंद्र डागा यांनी कामकाज पाहिले.