आरोपीसोबत अमानवीय व्यवहाराची तक्रार, चंद्रपूर पोलिस अधीक्षकांना हायकोर्टाने मागितले उत्तर
By राकेश पांडुरंग घानोडे | Published: October 2, 2023 04:54 PM2023-10-02T16:54:35+5:302023-10-02T16:54:50+5:30
संबंधित गुन्ह्यांत सात वर्षापेक्षा कमी शिक्षेची तरतूद
नागपूर : चंद्रपूर शहर पोलिसांनी एका आरोपीसोबत अमानवीय व्यवहार केल्याची तक्रार मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला करण्यात आली आहे. त्यामुळे न्यायालयाने चंद्रपूर पोलिस अधीक्षकांना यावर येत्या १७ ऑक्टोबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला आहे.
प्रकरणावर न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व वाल्मिकी मेनेझेस यांच्यासमक्ष सुनावणी झाली. मोहम्मद तेहसीन कांचवाला, असे आरोपीचे नाव आहे. १ मे २०२२ रोजी चंद्रपूर शहर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध विनयभंग व इतर संबंधित गुन्ह्यांतर्गत एफआयआर नोंदविला आहे. तो एफआयआर रद्द करण्यासाठी कांचवाला यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामध्ये त्यांनी पोलिसांनी केलेल्या अमानवीय व्यवहाराची माहिती दिली. तपास अधिकाऱ्यांनी अटक केल्यानंतर हाताला बेड्या लावल्या व त्याच अवस्थेत प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात नेले.
संबंधित गुन्ह्यांत सात वर्षापेक्षा कमी शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे अर्णेशकुमार प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करणे आवश्यक होते. परंतु, पोलिसांनी कुख्यात गुन्हेगारांसारखी वागणूक दिली, असा आरोप कांचवाला यांनी केला. तसेच, तपास अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची व भरपाई देण्याची मागणी केली. कांचवालातर्फे ॲड. राजेश नायक यांनी बाजू मांडली.