नागपूर : अभिवचन रजा (पॅरोल) व संचित रजा (फर्लो)संदर्भातील आदेशांचे वारंवार उल्लंघन केल्याचे आढळून आल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने बुधवारी नागपूर मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांना न्यायालय अवमानाच्या गुन्ह्यात दोषी ठरवले, तसेच त्यांना सात दिवस कारावास व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सात दिवस अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांनी हा निर्णय दिला.
कुमरे यांनी अभिवचन व संचित रजेसंदर्भातील तब्बल ४१ प्रकरणांमध्ये न्यायालयाच्या आदेशांचे पालन केले नसल्याचे आढळून आले. कुमरे यांनी ही चूक कायद्याच्या अज्ञानातून झाली, असे स्पष्टीकरण देऊन न्यायालयाची माफी मागितली. परंतु, न्यायालयाने आतापर्यंतचे अनुभव लक्षात घेता कुमरे यांचा बचाव अमान्य केला. कुमरे यांना न्यायालयाच्या आदेशांची माहिती होती. असे असतानाही त्यांनी जाणीवपूर्वक आदेशांचे उल्लंघन करून ३५ पात्र कैद्यांना रजा नाकारली तर, ६ अपात्र कैद्यांना रजा मंजूर केली. करिता, त्यांना माफ केले जाऊ शकत नाही, असे हा निर्णय देताना नमूद करण्यात आले.
कैद्यामुळे मनमानी कारभार उघड
अकस्मात अभिवचन रजा अवैधपणे नाकारण्यात आल्यामुळे हनुमान पेंदाम या कैद्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणीदरम्यान कुमरे यांचा मनमानी कारभार उघडकीस आला. दरम्यान, कुमरे यांनी स्वत:ला वाचविण्यासाठी न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. परिणामी, त्यांच्याविरुद्ध अवमान कारवाई सुरू करण्यात आली. या प्रकरणात ॲड. फिरदौस मिर्झा यांनी न्यायालय मित्र म्हणून कामकाज पाहिले.
निर्णयावर दहा आठवडे स्थगिती
कुमरे यांनी या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करणार असल्याची माहिती देऊन निर्णयावर स्थगिती देण्याची विनंती केली. त्यामुळे उच्च न्यायालयाने हा निर्णय दहा आठवड्यापर्यंत स्थगित केला. त्यानंतर स्थगितीचा आदेश आपोआप निष्प्रभ होईल, असेही स्पष्ट केले.