नागपूर : अमरावती येथील एका तरुणाने हिंदू मुलीसोबत लग्न व तिच्या धर्मपरिवर्तनाचे खोटे प्रमाणपत्र तयार केल्याची बाब मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातदेखील सिद्ध झाली. त्यामुळे उच्च न्यायालयानेही संबंधित मुलगी अविवाहित असण्यावर शिक्कामोर्तब केले. न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व गोविंद सानप यांनी हा निर्णय दिला.
सुरुवातीस ३० ऑगस्ट २०१८ रोजी अमरावती येथील कुटुंब न्यायालयाने पीडित मुलीला दिलासा दिला होता. या मुलीचे संबंधित मुलासोबत लग्न झाले नसून ती अविवाहित आहे, असे या न्यायालयाने जाहीर केले होते. त्या निर्णयाविरुद्ध संबंधित मुलाने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. ते अपील फेटाळून कुटुंब न्यायालयाचा निर्णय कायम ठेवण्यात आला.
संबंधित मुलगा सलमान व मुलगी कविता (दोन्ही नावे काल्पनिक) एकाच वॉर्डात राहतात. सलमानची बहीण कविताची मैत्रीण होती. त्यामुळे कविता सलमानच्या घरी जात होती. दरम्यान, सलमानने कविताशी ओळख वाढवून एक दिवस तिला लग्नाची मागणी घातली. कविताने प्रस्ताव नाकारला असता सलमानने तिला शिवीगाळ केली. परिणामी, कविताने सलमानच्या घरी जाणे सोडले होते. परंतु, सलमानच्या बहिणीच्या आग्रहामुळे तिने माघार घेतली. त्यानंतर जानेवारी-२०१२ मध्ये सलमानने ड्रायव्हिंग लायसन्स काढून देण्यासाठी कविताकडून रेशनकार्ड, छायाचित्र, महाविद्यालयाचे ओळखपत्र इत्यादी कागदपत्रे मिळविली आणि या कागदपत्रांच्या आधारावर कवितासोबत लग्न झाल्याचे खोटे प्रमाणपत्र तयार करून घेतले, तसेच तिच्या धर्मपरिवर्तनाचेही प्रमाणपत्र तयार केले.
पोलीस तक्रारीनंतर त्रास वाढला
सलमानने लग्नाचे खोटे प्रमाणपत्र तयार केल्याचे कळल्यानंतर कविताने कुटुंबीयांना माहिती दिली व सलमानविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. परिणामी, पुढे सलमानचे त्रास देणे वाढले. त्यामुळे कविताने कुटुंब न्यायालयात याचिका दाखल करून या लग्नाचे अस्तित्व नाही व ती अविवाहित आहे, असे जाहीर करण्याची विनंती केली होती. त्यात ३० ऑगस्ट २०१८ रोजीचा निर्णय देण्यात आला होता.