एचसीबीए निवडणूक तापली : निवडणूक समितीवर आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 09:59 PM2021-03-05T21:59:30+5:302021-03-05T22:01:14+5:30
HCBA election हायकोर्ट बार असोसिएशन (एचसीबीए) नागपूरच्या निवडणुकीचे वातावरण दिवसेंदिवस तापत चालले आहे. वकिलांच्या गटांनी विविध मुद्यांवरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करायला सुरुवात केली आहे. निवडणूक समितीलाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आल्यामुळे शुक्रवारी वकिलांमध्ये खळबळ उडाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हायकोर्ट बार असोसिएशन (एचसीबीए) नागपूरच्या निवडणुकीचे वातावरण दिवसेंदिवस तापत चालले आहे. वकिलांच्या गटांनी विविध मुद्यांवरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करायला सुरुवात केली आहे. निवडणूक समितीलाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आल्यामुळे शुक्रवारी वकिलांमध्ये खळबळ उडाली.
कोरोनाच्या सावटात ही निवडणूक घ्यावी अथवा नाही, यावरून वकिलांमध्ये मतभेद आहेत. दरम्यान, निवडणूक रद्द केली जाणार असल्याची चर्चा पसरल्यानंतर ॲड. श्रीरंग भांडारकर व इतर काही वकिलांच्या गटाने गुरुवारी निवडणूक समितीला निवेदन सादर करून निवडणूक रद्द करण्यास विरोध केला. तसेच, निवडणूक समितीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. निवडणूक समितीमध्ये ॲड. अरुण पाटील, ॲड. प्रकाश मेघे, ॲड. भानुदास कुलकर्णी, ॲड. फिरदोस मिर्झा व ॲड. संग्राम सिरपूरकर यांचा समावेश आहे. या सदस्यांनी शुक्रवारी सदर आरोपामुळे व्यथित होऊन राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, हायकोर्ट बार असोसिएशनसह काही वकिलांनी या सदस्यांची समजूत काढून त्यांना समितीमध्ये कायम राहण्याचा आग्रह केला. तसेच, ॲड. एस. एस. सन्याल व इतर काही वकिलांनी हायकोर्ट बार असोसिएशन व निवडणूक समितीला पत्र देऊन निवडणूक समिती सदस्यांवर त्यांचा पूर्ण विश्वास असल्याचे सांगितले. त्यामुळे प्रकरण निवळले.
निवडणूक लांबली
कोराेना संक्रमण वाढत असल्यामुळे एचसीबीए निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. ही निवडणूक आता १२ मार्चऐवजी २५ मार्च रोजी घेण्यात येणार आहे. निवडणूक समितीने शुक्रवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला.
'ऑनलाईन'चे मत अमान्य
हायकोर्ट बार असोसिएशनने विविध मुद्दे विचारात घेता ही निवडणूक ऑनलाईन घेता येईल, असे मत निवडणूक समितीला दिले होते. त्यानंतर ॲड. अतुल पांडे व इतर वकिलांनी निवेदन सादर करून ऑनलाईन निवडणूक घेण्यास विरोध दर्शविला. निवडणूक समितीने शुक्रवारी विविध बाबी लक्षात घेता, ऑनलाईन निवडणुकीचे मत अमान्य केले.