नागपूर : हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरच्या कार्यकारिणीने वाढते कोरोना संक्रमण, वकिलांचे कोरोनापासून संरक्षण, सरकारचे आदेश यासह विविध बाबी लक्षात घेता संघटनेची निवडणूक ऑनलाईन व्हावी यावर गुरुवारी सहमती दर्शवली व हे मत पाच सदस्यीय निवडणूक समितीला कळवले. निवडणूक समितीची बैठक शुक्रवारी होणार असून तीत यावर पुढील विचारमंथन करून आवश्यक निर्णय घेतला जाणार आहे.
कोरोनाच्या सावटामध्ये येत्या १२ मार्च रोजी निवडणूक घ्यावी अथवा नाही, यावर चर्चा करण्यासाठी संघटनेची कार्यकारिणी व निवडणूक समिती यांची गुरुवारी संयुक्त बैठक झाली. दरम्यान, निवडणूक समितीने संघटनेच्या कार्यकारिणीचे यावर स्वतंत्र मत मागितले. त्यामुळे संघटनेच्या कार्यकारिणीने वेगळी बैठक घेऊन निवडणूक ऑनलाईन घेता येऊ शकेल असे मत निवडणूक समितीला कळवले आहे. आता चेंडू निवडणूक समितीच्या दारात असून त्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
------------
निवडणूक घेण्याची मागणी
गुरुवारी ६० वर वकिलांनी निवडणूक समितीला निवेदन सादर करून निर्धारित कार्यक्रमानुसार निवडणूक घेण्याची मागणी केली. निवडणूक रद्द करणे योग्य होणार नाही असे त्यांनी नमूद केले.