अंकिता देशकर
नागपूर : भारताच्या नॅशनल क्राईम रेकार्ड ब्युराेच्या नाेंदीनुसार २०२० साली देशात बलात्काराच्या २८,०४६ घटना घडल्या. म्हणजे दर दिवशी तब्बल ७७ बलात्कार. ही केवळ नाेंद झालेली प्रकरणे आहेत आणि खरा आकडा कितीतरी अधिक असण्याची शक्यता आहे. विनयभंगाच्या प्रकरणात अनेकदा तक्रारही केली जात नाही. देशातील या वास्तवाने अस्वस्थ झालेल्या एका तरुण पत्रकाराने देश बलात्कारमुक्त व्हावा, या इच्छेतून थेट कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रा सुरू केली आहे.
नाशिक येथील रहिवासी विनायक निंबाळकर असे या तरुणाचे नाव आहे. आपल्या यात्रेदरम्यान नागपूरला पाेहचलेल्या विनायक यांच्याशी लाेकमतने संवाद साधला. एक पत्रकार म्हणून नियमित वर्तमानपत्र वाचनाची सवय आहे. मात्र काेराेना महामारीच्या काळात वर्तमानपत्रांतील बहुतेक मथळे महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचे हाेते. त्यावेळी प्रचंड अस्वस्थ वाटत हाेते. त्यामुळे अशा प्रकाराविराेधात लाेकांना जागृत करण्यासाठी काहीतरी करावे, असा निर्धार केला. तेव्हा बलात्कार व स्त्रियांच्या छेडखानीविराेधात जनजागृती करण्यासाठी कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रा करावी, असा निर्धार केला.
सुरुवातीपासून ग्रामीण भागामध्ये जनजागृती करण्यावर लक्ष केंद्रित केल्याचे विनायक यांनी सांगितले. देशातील खेडे अद्यापही अंधारात असून महिलांचे स्थान समाजाच्या वंचित घटकांमध्येच माेडते आणि अशा प्रकरणात त्या कधी तक्रारही करीत नाहीत. महामार्गांवर विनयभंगाचे प्रकार खूप घडतात. एखादी मुलगी रस्त्याने जाताना दिसली की माणसे काही ना काही कमेंट करतातच. गावांमध्ये आजही मुली व त्यांचे कुटुंबीय अशा प्रकरणात भीती, प्रतिमा खराब हाेण्याची आणि कुणी लग्न करणार नाही या चिंतेने तक्रार दाखल करीत नाहीत. मात्र काळ बदलत असून लाेकांची मानसिकताही बदलत असल्याचे ते म्हणाले.
विनायक यांनी या यात्रेदरम्यान अनेक गावांना भेट दिली. विशिष्ट मार्ग ठरविला नाही पण यात्रेत गावाेगाव फिरून कारगीलला पाेहचणार असे त्यांनी सांगितले. उल्लेखनीय म्हणजे विनायक यांच्या यात्रेत केरळचे स्वतंत्र छायाचित्रकार शिव शिवा आणि आंध्रप्रदेशचे बशीर शेख हे दाेन व्यक्तीसुद्धा जुळले गेल्याचे त्यांनी सांगितले.
थोडा बदलही समाधानकारक
या पदयात्रेने समाजात खूप बदल घडेल असे नाही पण जाे थाेडा बदल घडेल ताे समाधानकारक ठरेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. समाजात निषिद्ध मानल्या जाणाऱ्या या विषयावर लाेक बाेलू लागतील, हे महत्त्वाचे आहे असेही ते म्हणाले.