नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सोमवारी सकाळी ते घरी परतले. पत्नी आणि तरुण मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडून आहे, हे त्यांच्या लक्षातच आले नाही. त्यांनी आंघोळ केली अन् पिशवी घेऊन बाजूच्याच बाजारात गेले. तेथून आंबे, कांदे विकत घेतले अन् घरी आले. आंबे आणल्याचे सांगत त्यांनी पत्नीला उठविले आणि नंतर सुन्नच पडले. पत्नी, मुलगी दोघीही रक्त्याच्या थारोळ्यात पडून होत्या. अत्यंत थरारक उदाहरण ठरलेल्या वृद्ध देवीदास बोबडे यांच्या वाट्याला हा नियतीचा सूड आला आहे. तो ऐकून कुणाच्याही काळजाचे पाणी व्हावे.
घरात वृद्ध पत्नी, तरुण मुलगी अन् घरची आर्थिक स्थिती अत्यंत खराब. त्यामुळे ६५ वर्षीय देवीदास बोबडे या वयातही सिक्युरिटी गार्ड म्हणून चंद्रलोक बिल्डिंगमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून रात्री कामाला जातात. नेहमीप्रमाणे २० जूनला रविवारी रात्री ते कामावर गेले. सोमवारी सकाळी ९ ते १० च्या दरम्यान घरी परतले. पत्नी लक्ष्मीबाई आणि मुलगी अमिषा गादीवर पडून दिसल्या. झोपून आहेत, असे समजून बोबडेंनी स्वत:च पाणी गरम केले. आंघोळ केली अन् पिशवी उचलून बाजारात गेले. रात्री पत्नीने आंबे सांगितले होते. कांदेही घरात नव्हते. त्यामुळे आंबे आणि कांदे विकत घेऊन घरी परतले. ते पत्नीच्या हाती देण्यासाठी त्यांनी लक्ष्मीबाईंच्या अंगावरची चादर सारली अन् शहारलेच. लक्ष्मीबाई आणि अमिषा रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. ते विदारक दृश्य पाहून वृद्ध बोबडे यांची काही वेळेसाठी वाचाच गेली.
---
ते कमी की काय...
ते कमी काय म्हणून काही वेळेतच त्यांच्याकडे पोलीस पोहोचले. तुमची मुलगी विजया, नात परी आणि नातू साहिल यांची हत्या झाली असून, जावई (आरोपी) आलोकने गळफास लावून स्वत:ला संपवल्याचे त्यांना पोलिसांनी सांगितले. आयुष्याच्या सायंकाळी असा नियतीने क्रूर सूड उगवला. बोबडे यांचे कुटुंबच नव्हे तर अवघे विश्वच संपले आहे. ते सैरभैर झाले आहेत. त्यांच्या भावाने त्यांना स्वत:कडे ठेवून घेतले असले तरी त्यांची अवस्था शब्दातीत झाली आहे.
---
वैद्यकीय अहवाल मिळाला
डॉक्टरांनी आलोकच्या क्राैर्याला बळी पडलेल्या परी, विजया, अमिषा आणि लक्ष्मीबाई या चाैघांचा मृत्यू गळा कापल्याने तर साहिलचा मृत्यू श्वास गुदमरल्याने झाल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद केले आहे. डॉक्टरांनी शहर पोलिसांना आज हा अहवाल अर्थात पीएम रिपोर्ट दिला. लोकमतने यापूर्वीच या पाचही जणांच्या मृत्यूचे कारण वैद्यकीय आणि पोलीस सूत्रांच्या हवाल्याने आधीच दिले, हे विशेष ।
---