जगदीश जोशी
नागपूर : बीसीत गुंतवणूक करण्याच्या नादात कोट्यवधी रुपये गमावलेले इतवारीचे व्यापारी संकटात सापडले आहेत. कॉस्मेटिक आणि इतर व्यवसायाशी निगडित पीडित व्यापाऱ्यांनी पोलिसात तक्रार देण्यासाठी एका बैठकीचे आयोजन केले. परंतु काही जणांनी त्यास सहमती न दिल्यामुळे पोलिसात तक्रार देण्यावर एकमत झाले नाही.
‘लोकमत’ने इतवारीच्या एका कॉस्मेटिक व्यापाऱ्याने बीसीच्या नावावर कोट्यवधींनी फसवणूक केल्याचा खुलासा केला होता. वृत्त प्रकाशित झाल्यानंतर इतवारीच्या व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. १५ दिवसांपासून कॉस्मेटिक व्यापारी गायब झाल्यामुळे गुंतवणूकदारांना आपली फसवणूक झाल्याचे कळले. लोकमतने खुलासा केल्यानंतर पीडित कॉस्मेटिक व्यापाऱ्याने दिलेले कागदपत्र घेऊन फिरत आहेत. यातील एक कागद लोकमतच्या हाती लागला आहे. कॉस्मेटिक व्यापारी बीसीसोबत मासिक जमा करण्यात येणारी रक्कमही स्वीकारत होता. तो एस. एस. ग्रुपच्या नावाने मासिक जमा स्कीम चालवित होता. या स्कीममध्ये ४०० सदस्य होते. त्यांच्याकडून दर महिन्याला दोन हजार रुपये घेण्यात येत होते. ही स्कीम ५० महिने चालणार होती. कॉस्मेटिक व्यापाऱ्याने २० महिन्यापुर्वी ही स्कीम सुरू केली होती. यातील सदस्य २० महिन्यापासून मासिक दोन हजार रुपये जमा करीत होते. एस. एस. स्कीम अंतर्गत ४०० सदस्यांची २० महिन्यात १.६० कोटीची रक्कम जमा झाली. २० महिन्याच्या काळात कॉस्मेटिक व्यापाऱ्याने मासिक ड्रॉ काढून सदस्यांना पैसेही परत केले. परंतु ड्रॉच्या लाभार्थ्यांची नावे आणि रक्कम माहीत नसल्यामुळे एस. एस. ग्रुपशी निगडित सदस्यांना स्कीममध्ये गोलमाल सुरू असल्याचा संशय आहे. एस. एस. स्कीमच्या सदस्यांना एक कार्ड देण्यात आले होते. त्यावर पैसे मिळाल्याची तारीख लिहिलेली होती. पैसे घेण्यासाठी एक युवक आणि युवती येत होते. ते या कार्डावर स्वाक्षरी करीत होते. या कार्डावर स्कीमचा म्होरक्या कॉस्मेटिक व्यापाऱ्याचे नाव, नंबर आणि पत्ता आदीची माहिती नाही. कोट्यवधी रुपये गमावल्यामुळे पीडित व्यापारी पोलिसांकडे जाण्यास टाळाटाळ करीत आहेत. कॉस्मेटिक व्यापाऱ्याने स्वत:चे बरेवाईट करण्याची धमकी दिल्यामुळे ते तक्रार देण्यास टाळाटाळ करीत आहेत. काही दिवसांपूर्वी पाचपावलीचा एक व्यापारी कॉस्मेटिक व्यापाऱ्याच्या घरी गेला असता त्याने भिंतीवर डोके आदळून फोडून घेतले. याशिवाय स्वत:चे बरेवाईट करण्याची धमकी दिली होती.
.............
पिडितांना वाटत आहे भीती
मोठी रक्कम गमावणाऱ्या व्यापाऱ्यात इमिटेशन ज्वेलरी विक्रेत्यांची संख्या अधिक आहे. नागपूर इमिटेशन ज्वेलरीचा मोठा बाजार आहे. रोज लाखोच्या घरात व्यवसाय होतो. कॉस्मेटिक व्यापाºयाला या व्यापाऱ्यांनी रोख रक्कम दिली होती. फसवणूक झाल्याची बाब पोलिसात गेल्यास आपल्याला त्रास होईल, अशी भीती व्यापाऱ्यांना वाटत आहे.
.............