नागपूर : पॅरोलवर सुटून बाहेर आलेल्या गुन्हेगाराने स्वत:च्याच साथीदाराचा खून केला. अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पार्वतीनगरात ही घटना घडली असून यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण होते. आश्चर्याची बाब म्हणजे ज्याचा खून झाला तोदेखील एका हत्याप्रकरणातील आरोपी होता. विक्की चंदेल असे मृतकाचे नाव असून राकेश पाली असे मुख्य आरोपीचे नाव आहे.
राकेश व विक्की हे दोघेही गुन्हेगारी प्रवृत्तीचेच आहेत. काही काळाअगोदर त्यांनी प्रतिस्पर्धी टोळीतील तरुणाचा खून केला होता. त्या प्रकरणात दोघेही आरोपी होते व नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होते. कैद्यांसाठी असलेल्या नियमावलीचा फायदा घेत राकेश पॅरोलवर सुटून बाहेर आला होते. राकेशचा त्याचा भाचा शुभम याच्यावर फार विश्वास आहे. दारूच्या नशेत विक्कीने शुभमला काही दिवसांअगोदर शिवीगाळ केली व मारहाण केली. ही बाब शुभमने त्याच्या मामाला सांगितली. यावरून राकेशने विक्कीला जाबदेखील विचारला व त्यांच्यात वाद झाला. राकेश संतापाने पेटला होता व त्यातूनच त्याने विक्कीला संपविण्याचा कट रचला. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्याने विक्कीला पार्वतीनगरात बोलविले. तेथे इतर साथीदारांच्या मदतीने त्याच्यावर हल्ला केला व चाकू तसेच कुऱ्हाडीने वार केले. विक्कीला पळून जाण्याची संधीच मिळाली नाही व तो रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला. तो खाली पडल्यावरदेखील आरोपी त्याच्यावर वार करतच होता. त्याच्या ओरडण्यामुळे लोक जमा झाले व आरोपींनी पळ ठोकला. ही बातमी कळताच अजनी पोलिस ठाण्यातील पथक व अधिकारीदेखील घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी राकेशविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. माहिती मिळेपर्यंत पोलिसांनी शुभमला ताब्यात घेतले होते, तर राकेशसह इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
मृत आरोपीने २०१३ मध्ये केली होती हत्या
राकेश व विक्की यांनी २०१३ साली धंतोलीत आशिष बुधबावडे या तरुणाची हत्या केली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत संजय वाघाडे हा आरोपीदेखील होता व संजयचाच आशिषशी वाद झाला होता. विशेष म्हणजे, संजयदेखील त्यावेळी काही दिवसांअगोदरच कारागृहातून सुटून बाहेर आला होता.