नागपूर : उचलेगिरी करणाऱ्या टोळीने इनोव्हाच्या ड्रायव्हरला त्याचे ७० रुपये खाली पडल्याचे सांगितले. ड्रायव्हर लागलीच पैसे उचलण्यासाठी गाडीतून खाली उतरला. ही संधी साधत चोरट्यांनी गाडीतून सात लाख रुपये असलेली बॅग आणि लॅपटॉप लंपास केला. लोकमत चौकात शुक्रवारी दिवसाढवळ्या ही घटना घडली. गेल्या दहा दिवसात ही सहावी घटना घडल्यामुळे पोलिसात खळबळ उडाली आहे.
रहाटे कॉलनी येथील रहिवासी वासुदेव झामनानी शासकीय कंत्राटदार आहेत. त्यांचे धंतोलीत कार्यालय आहे. झामनानी यांनी मुलाच्या वैद्यकीय तपासणीसाठी लोकमत इमारतीतील एका डॉक्टरची दुपारी १.३० वाजताची वेळ घेतली होती. ते मुलासोबत इनोव्हा क्रमांक एम. एच. ३१, एफ. एल-७७७६ मध्ये बसून लोकमत इमारतीत पोहोचले. मुलासोबत ते डॉक्टरकडे गेले. इनोव्हाचा चालक दीनदयाल रहांगडाले गाडीत बसला होता. झामनानी गेल्यानंतर काही मिनिटात एक युवक दीनदयालजवळ आला. त्याने दीनदयालला तुमचे पैसे पडले आहेत, असे सांगून रस्त्याकडे बोट दाखविले. दीनदयाल पैसे उचलण्यासाठी ड्रायव्हिंग सीटवरून उतरून बाहेर आला. त्यावेळी युवकाच्या एका साथीदाराने विरुद्ध दिशेने इनोव्हाचे दार उघडून मागील सीटवर ठेवलेली बॅग उचलून पळ काढला. बॅगमध्ये सात लाख रुपये, लॅपटॉप, आयपॅड आणि झामनानी यांच्या कंपनीची महत्त्वाची कागदपत्रे होती. दरम्यान, दीनदयाल नोट उचलून आपल्या सीटवर बसला. त्याला बॅग चोरी झाल्याचे समजले नाही. मुलाची तपासणी झाल्यानंतर झामनानी परत इनोव्हात बसले असता त्यांना बॅग दिसली नाही. त्यांनी दीनदयालला विचारणा केली असता त्याने बॅगबद्दल माहिती नसल्याचे सांगितले. त्यानंतर झामनानी यांच्या लक्षात सारा प्रकार आला. त्यांनी सीताबर्डी पोलिसात तक्रार दिली. निरीक्षक अतुल सबनीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दोन आरोपी बॅग नेताना दिसले. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा तपास सुरू केला आहे. झामनानी यांना मजुरांचे वेतन द्यायचे असल्यामुळे ते रोख रक्कम काढून कार्यालयात नेत होते. आरोपी कुख्यात गुन्हेगार असल्याचा अंदाज असून ते काच फोडून इनोव्हातील बॅगची चोरी करू इच्छित होते. परंतु चालक इनोव्हात बसून असल्यामुळे त्यांनी जमिनीवर नोटा फेकून दीनदयालची दिशाभूल करून बॅग पळविली. सीताबर्डी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
.........
‘लोकमत’ने केला होता खुलासा
सहा ऑगस्टला ‘लोकमत’ने कारमधून रोख रक्कम तसेच महागडे साहित्य चोरी करणारी टोळी सक्रिय झाल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. कारची काच फोडून कारमधून रोख आणि महागडे साहित्य आरोपींनी चोरी केले होते. या वृत्तानंतर पोलीस सक्रिय झाल्यामुळे या घटना बंद झाल्या होत्या. मागील आठवड्यात अशी घटना घडली नाही. परंतु शुक्रवारी घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांची चिंता वाढली आहे.
..............