नागपूर : भाजप सरकारच्या काळात हजारो कोटींचा महाआयटी घोटाळा झाला व त्यात अमोल काळे हे सहभागी असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. यावर राजकारण तापले असतानाच अमोल काळे यांनी निवेदन जारी करून आपली बाजू मांडली आहे. मी राज्य शासनाचे कुठलेही कंत्राट घेतले नसून, देशाबाहेर पळून जाण्याचा प्रश्नच येत नाही. मी देशातच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
मागील दोन दिवसांपासून अमोल काळे यांचे नाव चर्चेत आहे. काळे यांना देशाबाहेर पळवून लावण्यात आल्याचा आरोप महाविकास आघाडी शासनातील मंत्र्यांनी केला. यानंतर काळे यांनी आपली भूमिका मांडली. मी एक खासगी व्यावसायिक तसेच मुंबई क्रिकेट असोसिएशनचा उपाध्यक्ष आहे. गेले दोन दिवस तसेच आज सकाळी विविध वृत्तवाहिन्यांवर तसेच समाजमाध्यमांवर काही नेत्यांची माझ्या संदर्भातील वक्तव्ये पाहण्यात व वाचण्यात आली. ही सारी वक्तव्ये पूर्णतः दिशाभूल करणारी आणि माझी बदनामी करणारी आहेत.
महाराष्ट्र शासनाचे कुठलेही कंत्राट मी घेतलेले नाही. माझ्या खासगी व्यवसायाचा संपूर्ण तपशील माझ्या प्राप्तीकर विवरणात नमूद आहेत. असे असतानाही केवळ संभ्रम निर्माण करण्यासाठी माझी हेतूपुरस्सर बदनामी जे नेते करताहेत, त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई मी प्रारंभ करतो आहे. त्यामुळे मी कुठेही परदेशात जाण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. काळे सद्यस्थितीत नेमके कुठल्या शहरात आहेत व ते प्रत्यक्ष समोर कधी येणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.