नरेश डोंगरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - कोणताही वाद नाही, पूर्ववैमनस्य नसताना एका सराईत गुन्हेगाराने क्षुल्लक कारणावरून एकाची हत्या केली. रक्तरंजित कपड्याने घरी जाऊन भावाचा वाढदिवस साजरा केला. केक कापला. त्यानंतर मित्रांसह प्रेयसीच्या घरी जाऊन ओली पार्टी करीत मौजमजा केली.
बालवयातच गुन्हेगारी वृत्ती अंगिकारलेल्या निंबू उर्फ शुभम गजानन निंबूळकर (वय २१) या गुन्हेगाराच्या अमाणूष वृत्तीचा विकृत चेहरा पोलीस तपासात उघड झाल्यानंतर पोलिसांच्याही अंगावर काटा उभा राहिला.
मुळचा छत्तीसगडमधील रहिवासी असलेला सूरज नामक मजूर शनिवारी सायंकाळपासून दारूच्या नशेत झिंगू लागला. झोकांड्या घेत तो एमआयडीसीत पोहचला अन् इंदिरा माता नगरातील बावणे नामक व्यक्तीच्या घराशेजारी असलेल्या गिट्टीच्या ढिगाऱ्यावर पडला. तो रात्रीपर्यंत तसाच पडून राहिला. याच भागात राहणारा कुख्यात गुंड निंबू त्याच्या भावाच्या बर्थ डेचा केक घेऊन मंगेश राय आणि आकाश शिंदे या दोन साथीदारांसह जात होता. हे तिघेही टून्न होते. रस्त्याच्या कडेला सूरज (ज्याच्यासोबत कसलीही ओळख नाही, वाद नाही) पडून दिसल्याने त्याच्यातील गुन्हेगार जागा झाला. निंबूने सूरजला उठवून उभे करण्याचा प्रयत्न केला. यात दोघेही बाजुच्या चिखलात पडले अन् निंबूचा चिखलाने माखलेला हात सूरजच्या तोंडावर फिरला. त्याचक्षणी सूरजने निंबूला जोरदार थप्पड लगावली. अल्पवयीन असतानाच एकाचा जीव घेणारा अन् नंतर गुन्हेगारीत सक्रीय झालेला निंबू चवताळला. त्याने बाजुचा दगड घेऊन सूरजला डोक्यावर ठेचणे सुरू केले. तो अर्धमेल्या अवस्थेत असताना त्याला बाजुच्या नाल्यात फेकले अन् घरी निघून गेला. घरी भावाचा बर्थ डे साजरा केला. केक कापला. नंतर मित्रांसह प्रेयसीच्या घरी गेला. तेथे यथेच्छ दारू पिला अन् रात्रभर मौजमजा केली.
दगडाने ठेचलेला सूरजचा मृतदेह परिसरात थरार निर्माण करून गेला. मृताची ओळख नसल्याने आरोपींना शोधणे कठीण असते. मात्र, एका खबऱ्याने पोलिसांचे काम सोपी केले. निंबू आणि साथीदारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
तंत्रशुद्ध तपास अन् दोषसिद्धता वाढावी
एका निरपराध मजुराचा कारण नसताना जीव घेतल्याची निर्दयी निंबूला खंत नाही. त्याच्या हातून घडलेला हत्येचा हा दुसरा गुन्हा आहे. अशा गुन्हेगारांना समाजात मोकाट फिरता येऊ नये, यासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे. त्यासाठी पोलिसांना तंत्रशुद्ध तपासाकडे तसेच दोषसिद्धतेकडे खास लक्ष द्यावे लागणार आहे.