लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अडीच लाख रुपयांचे कर्ज घेण्याच्या मोबदल्यात स्वत:चा जीव वाचवण्यासाठी एका महिलेला आणि तिच्या मुलाला एक कोटी रुपयांची संपत्ती गमवावी लागली. कुख्यात तपन जयस्वाल आणि त्याच्या टोळीने हे कृत्य केले.विमल काळमेघ, रा. वानाडोंगरी असे पीडित महिलेचे नाव आहे. विमल या एकुलता एक मुलगा राहुलसोबत राहतात. डिसेंबर २०१३ मध्ये राहुलने घराच्या बांधकामासाठी तपनकडून १७.५ टक्के व्याजाने अडीच लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. तपनने व्याजाचे ३५ हजार रुपये कापून २.१५ लाख रुपये राहुलला दिले. २०१४ मध्ये जानेवारी ते मार्च पर्यंत राहुलने प्रत्येक महिन्यात व्याजाचे ३५ हजार रुपये तपन आणि त्याचा साथीदार गोलू मलियेला दिले. जेव्हा व्याज देणे शक्य झाले नाही तेव्हा राहुलने गोलूला आपली अडचण सांगितली. तेव्हा गोलूने तीन ते चार महिन्याची किश्त मी भरतो म्हणून सांगितले. जुलै २०१४ मध्ये गोलूने राहुलला तपनच्या अभ्यंकरनगर येथील आॅटोमोबाईलच्या दुकानात नेले. तिथे तपनने माऊजरच्या धाकावर राहुलला मारहाण केली. पोलिसात तक्रार करण्याचा इशारा दिल्यावर तपन आपसात वाद सोडवण्यास तयार झाला. त्याने राहुलला जानेवारी २०१५ पर्यंतचे व्याज आणि मूळ रक्कम परत करण्यास सांगितले. जानेवारी महिन्यानंतरही तपन, गोलू, आशिष ऊर्फ दाततुट्या आणि रवी अन्ना राहुलला धमकावू लागले. त्यांनी राहुलला जिवे मारण्याची धमकी देत त्याच्या आईकडून प्लॉटचे मूळ दस्तऐवज घेतले.एक दिवस अचानक राहुल आणि त्याच्या आईला वर्तमानपत्रात त्यांच्या प्लॉटच्या विक्रीची जाहिरात दिसून आली. याबाबत विचारणा केली असता तपन व त्याच्या साथीदारांनी विमल यांना त्यांच्या मुलाची हत्या करण्याची धमकी दिली. भीतीमुळे विमल आणि राहुल ९० लाखाचे घर विकण्यास तयार झाले. तपनने १७ मार्च २०१५ रोजी त्याचे वडील रमेश जयस्वालच्या नावावर केवळ ६ लाख रुपयात घराची रजिस्ट्री केली. यानंतर तपनने राहुलला सांगितले की, २.५० लाखाच्या कर्जाची रक्कम व्याजासह ९ लाख रुपये झाली. घराच्या मोबदल्यात दिलेले ६ लाख रुपये पकडले तर ही रक्कम १५ लाख रुपये झाली. १५ लाखावर दर महिन्याला व्याजासह ६३ हजार रुपये द्यायला सांगितले.जीवाच्या भीतीने राहुलने जवळपास वर्षभर तपनला मासिक हप्ता दिला. या अडीज लाखाच्या कर्जापोटी त्याला १५ लाख रुपये आणि ८० ते ९० लाख रुपय किमतीचे निर्माणाधीन दोन मजली घर गमवावे लागले.तपनकडे गोलू मलिये, आशिष ऊर्फ दाततुट्या आणि रवि उर्फ अण्णासारखे गुन्हेगार असल्यामुळे राहुल आणि त्याची आई काही बोलू शकले नाही. ते वानाडोंगरी येथेच भाड्याच्या घरात राहू लागले. गुन्हे शाखेने तपन व त्याच्या साथीदाराला सावकारी आणि खंडणी वसुलीच्या गुन्ह्यात अटक केल्याचे माहीत होताच दोघांची हिंमत वाढली. त्यांनी बुधवारी सकाळी गुन्हे शाखेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरु केला आहे. बजाजनगर येथील प्रकरणात पोलीस कोठडी संपल्याने आज तपन आणि त्याच्या तीन साथीदारांना न्यायालयात सादर करण्यात आले. न्यायालयाने तपनची एक दिवसाठी पोलीस कोठडी वाढवली आहे.
अडीच लाखाच्या कर्जापोटी एक कोटी रुपये गमावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 10:03 PM
अडीच लाख रुपयांचे कर्ज घेण्याच्या मोबदल्यात स्वत:चा जीव वाचवण्यासाठी एका महिलेला आणि तिच्या मुलाला एक कोटी रुपयांची संपत्ती गमवावी लागली. कुख्यात तपन जयस्वाल आणि त्याच्या टोळीने हे कृत्य केले.
ठळक मुद्दे कुख्यात तपन जयस्वालचे कृत्य: दोन मजली घराची बळजबरीने विक्री