नागपूर : हुडकेश्वर रोड राजापेठ येथे खून झालेला दुबेनगर येथील रहिवासी शीतल श्यामराव राऊत हा विदर्भातील टॉपर क्रिकेट सट्टा बुकी होता. क्रिकेटच्या गत आयपीएल चषकदरम्यान मोठ्या प्रमाणावर क्रिकेट सट्टा खेळला गेला. सट्ट्याच्या धंद्यातील सहा लाखांच्या थकबाकीतून त्याचा खून करण्यात आला. या प्रकरणी अटकेतील चार आरोपींना बुधवारी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी श्रीमती आर. आर. लोहिया यांच्या न्यायालयाने २० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. श्रीकांत ऊर्फ चिंगा महादेव थोरात (२४) रा, बापूनगर सक्करदरा, राजू ऊर्फ बल्ली परसराम शेंडे (२७) रा. वैभवनगर सक्करदरा, राजेश ऊर्फ राजू अण्णा मधुकर मस्के (२५) रा. जीजा मातानगर दिघोरी आणि रोशन ऊर्फ गोट्या अशोकराव मोहिते (२६) रा. दसरा रोड महाल, अशी आरोपींची नावे आहेत. त्यापैकी श्रीकांत हा सहायक फौजदाराचा मुलगा आहे. या सर्व आरोपींना मंगळवारच्या रात्री ११ वाजताच्या सुमारास अटक करण्यात आली. १५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.१५ वाजताच्या सुमारास राजापेठ येथील प्रिन्स पानठेल्यासमोर शीतल राऊत याचा शस्त्राने भोसकून आणि दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला. या प्रकरणाचे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक जी. पी. इंगळे यांनी आरोपींना बुरख्यात आणून न्यायालयात हजर केले. २४ डिसेंबरपर्यंत आरोपींच्या पोलीस कोठडी रिमांड मागणी करताना सरकार पक्षातर्फे न्यायालयाला असे सांगण्यात आले की, सात महिन्यापूर्वी आयपीएल क्रिकेट सामन्याच्या सट्ट्याचे शीतल राऊत याचा पुतण्या राहुल राऊत याला श्रीकांत थोरात याच्याकडून १० लाख रुपये घेणे होते. त्यापैकी त्याने वेळोवेळी चार लाख रुपये परत केले होते. त्याला सहा लाख रुपये देणे होते. वारंवार पैशाची मागणी करून शीतल हा श्रीकांतसोबत सतत वाद घालत होता. ‘तुझी किडनी विकून पैसे वसूल करील’, अशी धमकी तो श्रीकांतला देत होता. परिणामी श्रीकांतने आपल्या साथीदारांच्या मदतीने शीतलचा खून केला. हल्ला करताना खुद्द श्रीकांत आणि राजू बल्ली हे जखमी झालेले आहेत. या खुनात अटक झालेल्या आरोपींचे आणखी कोणी साथीदार सहभागी आहेत काय, कोणी सूत्रधार आहे काय, हे हुडकून काढण्यासाठी आरोपींना पोलीस कोठडी रिमांड देण्यात यावा, अशी मागणी सरकार पक्षाकडून करण्यात आली. आरोपींचे वकील अॅड. लुबेश मेश्राम यांनी आरोपींना कमी मुदतीची पोलीस कोठडी मिळावी, यासाठी युक्तिवाद केला. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून आरोपींना २० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. (प्रतिनिधी)बुकींचे दुबई कनेक्शनसूत्रांच्या माहितीनुसार शीतल हा संपूर्ण विदर्भात वरच्या फळीतील क्रिकेट सट्टा बुकी होता. अजय नावाच्या आपल्या भावासोबत तो हा धंदा करायचा. अजय हा वर्धा मार्गावरील एका हॉटेलात पकडल्या गेल्यापासून तो गोव्यात स्थायिक झाला. शीतलला आपल्या भागातील सट्ट्याची संपूर्ण उतारी अजयकडे करायचा आणि अजय हा ही उतारी दुबईत करायचा. राऊत बंधुंच्या या धंद्याचे नेटवर्क दुबईपर्यंत होते. शहर पोलीस या नेटवर्कपासून अनभिज्ञ होते, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
‘तो’ खून क्रिकेट सट्ट्याच्या थकबाकीतून
By admin | Published: December 18, 2014 2:38 AM