रेवराल (मौदा): पोळ्याच्या पाडव्याला जुगार खेळताना चौघांत वाद झाला. या वादाची परिणिती मारहाणीत झाली. यातील एकाने जीव वाचविण्यासाठी कारने गावानजीकच्या सांड नदीच्या दिशेने पळ काढला. तिथे चिखलात त्याची कार फसली. कार बाहेर निघत नसल्याचे पाहून त्याने नदीत उडी घेतली. मात्र पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने तो वाहून गेला. बुधवारी सकाळी त्याचा मृतदेह आढळून आल्याने गावात खळबळ उडाली. कैलास श्यामराव वाकडे (३५, रा. धानला) असे मृताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार धानला येथे मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास बाजार चौकात जुगाराच्या वादात कैलास शामराव वाकडे (३४) याचे राजेंद्र राजगिरे (४०), राकेश राजगिरे (२५) व हर्षद बावणे (२५) यांच्याशी भांडण झाले. यात दोन्ही पक्षाने एकमेकांना मारहाण केली. राजगिरे व बावणे आपल्याला पुन्हा मारतील या भीतीने कैलास त्याच्या कारने सांड नदीच्या दिशेने पळाला. येथे चिखलात त्याची कार फसली. तिथे त्याच्या मित्राने त्याला घरी चालण्याचा सल्ला दिला. मात्र राजगिरे आणि बावने आपल्या मागावर असल्याने त्याने नदीची दुसरा काठ गाठण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने तो वाहून गेला. दरम्यान, कैलास घरी आला नसल्याने त्याच्या कुटुंबीयांनी रात्री मौदा पोलिसांत याबाबत तक्रार दाखल केली. दरम्यान, बुधवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास धानला शिवारातील बाळकृष्ण राजगिरे यांच्या शेतालगत सांड नदीपात्रात त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पाेलीस अधिकारी मुख्तार बागवान, माैद्याचे तहसीलदार मलिक विराणी, पाेलीस निरीक्षक हेमंतकुमार खराबे, धानला येथील तलाठी व सुमारे १०० पाेलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला हाेता. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करीत कैलासचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नागपूर येथे रवाना केला. सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान कैलासच्या पार्थिवावर धानला येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा आप्तपरिवार आहे. त्याच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली.
या घटनेमुळे बुधवारी दिवसभर धानला येथे तणावपूर्ण स्थिती होती. गावात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कैलासचा मृत्यू झाला की घातपात अशीही चर्चा ग्रामस्थात होती. मौद्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंतकुमार खराबे या घटनेचा तपास करीत आहेत. वृत्तलिहिस्तोवर याप्रकरणी कुणावरही गुन्हा दाखल झालेला नव्हता.
----------