लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : गोसेखुर्द जलाशयाचा निसर्गरम्य परिसर डोळ्यात साठवून ठेवत दोघेही भाऊ आपल्या दोन मित्रांसह किनाऱ्यालगत उभे होते. अशातच धाकट्या भावाने दगडावर पाय ठेवला. सेकंदातच तोल गेल्याने ताे पाण्याच्या प्रवाहात आला. मोठ्या भावाने जिवाची बाजी लावत त्याला वाचविण्यासाठी हात दिला. यात तोसुद्धा ओढल्या गेला आणि दोघांचाही जीव गेला. काळीज पिळवटून टाकणारी ही घटना स्वातंत्र्यदिनी (रविवारी) सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास घडली.
पवनी (जिल्हा भंडारा) येथील गोसेखुर्द धरण बघण्यासाठी गेलेल्या उमरेड येथील दोन भावंडांना गोसेखुर्द जलाशयात जलसमाधी मिळाली. मंगेश मधुकर जुनघरे (३५) व त्याचा लहान भाऊ विनोद ऊर्फ लल्ला जुनघरे (३१, रा. मोहपा रोड, उमरेड) अशी मृत भावंडांची नावे आहेत. रविवारी मंगेश धाकट्या भावासोबत दुपारी २ वाजताच्या सुमारास उमरेड येथून गोसेखुर्द धरण बघावयास दुचाकीने निघाला. साेबत आनंद पाटील आणि जयद्रथ मडावी हे मित्रदेखील होते.
गोसेखुर्द जलाशयाकडे जाणारा मुख्य मार्ग बंद होता. पॉवर हाऊसनजीकचा दुसरा मार्ग मात्र सुरू होता. याठिकाणी सभोवताल गर्दी होती. याच गर्दीत चौघेही होते. अशातच विनोदने दगडावर पाय ठेवला. क्षणार्धात पाय घसरला आणि तोल जाऊन तो जलाशयात पडला. लागलीच आरडाओरड सुरू झाली.
पाच ते सहा फुटाच्या अंतरावर त्याचा मोठा भाऊ मंगेश उभा होता. विनाेद वाहून जात असल्याचे पाहून मंगेशने त्याला मदतीसाठी हात दिला. पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने दाेघेही आत खेचले गेले. विनोदने काही अंतरापर्यंत पोहण्याचा प्रयत्न केला. मित्रांनीही त्या दोघांना वाचविण्यासाठी धावपळ केली. वेळ निघून गेली होती आणि दोघेही जलाशयात दिसेनासे झाले होते. घटनेची नोंद पवनी पोलीस ठाण्यात आल्याने दाेघांच्याही पार्थिवावर पवनी येथील रुग्णालयात उत्तरीय तपासणी प्रक्रिया करण्यात आली. जत्यानंतर सोमवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास दाेघांच्याही पार्थिवावर वेकोलि स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
......
... आणि कुटुंबीयांनी हंबरडा फाेडला
मंगेश स्वस्त धान्य दुकान चालवायचा. सोबतच वीटभट्टीवरसुद्धा घाम गाळायचा. त्याला चार वर्षाचा मुलगा आहे. विनोदने इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले होते. त्याला पुण्यात नाेकरीसुद्धा होती. लॉकडाऊनमुळे ताे ‘वर्क फॉर्म होम’ करीत असल्याने उमरेड येथील घरीच वास्तव्याला होता. त्याचेही दोन वर्षापूर्वी लग्न झाले हाेते. त्याला अवघ्या आठ महिन्यांची तान्हुली आहे. दाेघांचेही मृतदेह घरी आणताच आई वडिलांसह त्यांच्या पत्नींनी हंंबरडा फाेडला. दोन्ही भावंडे सुस्वभावी आणि मनमिळाऊ होते. संपूर्ण कुटुंबच आनंदी जीवन जगत होते. दाेघेही अचानक गेल्याने त्यांच्या कुटुंबावर प्रचंड आघात झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.