लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सुरांचे स्वरांशी व आत्म्याचे आत्म्याशी भेट घडवून थेट ईश्वराशी संवाद साधण्याचे माध्यम म्हणजे सुफी. या सुफी संगीताला पारंपरिक कलावंतांनी सामान्य माणसांच्या मनात रुजविले. त्यातील एक नाव म्हणजे जैसलमेर, राजस्थानचे जगप्रसिद्ध कलावंत कुटले खान. याच कुटले खान यांनी रविवारी त्यांच्या सुफी अंदाजातून नागपूरकरांच्या मनाशी संवाद साधला. संगीताचा परमोच्च आनंद देणारे त्यांचे सुफी गायन थेट रसिकांच्या हृदयाला भिडले.लोकमतच्या पुढाकाराने आयोजित वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलअंतर्गत वसंतराव देशपांडे सभागृहाच्या मंचावर रविवारी कुटले खान यांच्या सुफी गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. लोकमतचे ... अनिरुद्ध हजारे यांनी त्यांचे स्वागत केले. खणखणीत आवाज आणि स्वरांमध्ये राजस्थानी शब्दांचा गोडवा मिश्रित असलेल्या त्यांच्या गायनाने खऱ्या अर्थाने रसिकांच्या कानामनात मिठास भरली. ‘बोले तो मिठो लागे, हंसे तो प्यारो लागे...’ या गीतातील बंदिशीप्रमाणेच त्यांचा अंदाज आणि याच अंदाजावर संत्रानगरीतील सुफी संगीताची आवड असलेले रसिक भाळले. ‘आवोनी पधारो म्हारे देस..., नैना मिलाके मोसे-छाप तिलक..., सानू एक पल चैन ना आवे..., किन्ना सोना तैनू रब ने बनाया..., अली मौला...’ अशा एकाहून एक सुफी गीतातून त्यांच्या लोकप्रिय अंदाजाचे दर्शन श्रोत्यांना घडले. प्रत्येक सादरीकरणावर प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसादातून हे जाणवत होते.त्यांच्या टीममधील कलावंत गफूर खान यांनी राजस्थानी संगीत चाहत्यांमध्ये खास पसंत केले जाणारे ‘करताल’ हे वाद्य वाजवून श्रोत्यांना स्वरांच्या लहरीने तल्लीन केले. कुटले यांनी ‘दमादम मस्त कलंदर...’ पेश करताच सभागृहातील श्रोते थिरकण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाही. कुटले यांचा सुफीबाज शेवटपर्यंत निनादत राहिला आणि या सुफियाना प्रवासात तल्लीन झालेल्या श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना अभिवादन केले.
बोले तो मिठो लागे, हसे तो प्यारो लागे... कुटले खान यांचे सुफी स्वर हृदयाला भिडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 1:08 AM
सुरांचे स्वरांशी व आत्म्याचे आत्म्याशी भेट घडवून थेट ईश्वराशी संवाद साधण्याचे माध्यम म्हणजे सुफी. या सुफी संगीताला पारंपरिक कलावंतांनी सामान्य माणसांच्या मनात रुजविले. त्यातील एक नाव म्हणजे जैसलमेर, राजस्थानचे जगप्रसिद्ध कलावंत कुटले खान. याच कुटले खान यांनी रविवारी त्यांच्या सुफी अंदाजातून नागपूरकरांच्या मनाशी संवाद साधला. संगीताचा परमोच्च आनंद देणारे त्यांचे सुफी गायन थेट रसिकांच्या हृदयाला भिडले.
ठळक मुद्देवर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल : रसिकांसाठी बहारदार मैफिल