योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : घरापासून हजारो किलोमीटर दूर असताना अचानक ‘लॉकडाऊन’चा पहिला झटका बसला. त्यानंतर काही कालावधीतच चोरांनी दुसरा धक्का दिला. ना फोन ना खिशात पैसे. आजारी पत्नी कशी असेल या चिंतेने अखेर त्यांनी एक मोठा निर्णय घेतला अन् पायीच प्रवास सुरू केला. वाटेत भुकेने वेळोवेळी छळले, पायांचे ठोकळे झाले, अगदी जीवच सोडून जातो की काय अशी अवस्था झाली. मात्र जिद्द कायम होती. अखेर मजलदरमजल करत नागपूरला पोहोचला अन् येथून पुढील प्रवासासाठी आशेचा किरण मिळाला. चक्क कन्याकुमारीहून वाराणसीकडे जाण्यासाठी हजारो किलोमीटरची पदयात्रा करणाऱ्याच्या डोळ्यातील अश्रू हेलावून टाकणारे होते.पांजरी येथील टोलनाक्याजवळ विविध राज्यातील मजूर, कामगार जमा होत आहेत. येथून दुसऱ्या राज्याकडे जाणाऱ्या ट्रक्स, बसेसमध्ये व्यवस्था होण्याची आशा त्यांना असते. संबंधित व्यक्तीदेखील शनिवारी नागपुरात दाखल झाली. सुरुवातीला एखादा कामगार असावा असे सेवाभाव करणाऱ्या कार्यकर्त्यांना वाटले. मात्र जेव्हा तो इंग्रजीत संभाषण करु लागला तेव्हा वास्तव समोर आले. नाव समोर येऊ देऊ नका ही विनंती करत त्यांनी त्याच्यावर आलेली आपबिती सांगितली.आईवडिलांचे पिंडदान करण्यासाठी ते रामेश्वरमला गेले होते. तेथून २० मार्च रोजी कन्याकुमारीला गेले. २३ मार्चला परतीचा प्रवास होता. परंतु लॉकडाऊनमुळे रेल्वेगाडी रद्द झाली. त्यांना तिकिटाचे पैसे तर परत मिळाले, मात्र कन्याकुमारी स्थानकावर दुर्दैव आडवे आले. चोरांनी बॅगच चोरी केली व त्यातील आधार कार्ड, पैसे, कार्ड, मोबाईल सर्वच चोरी गेले. अशा स्थितीत डोळ्यासमोर अंधारीच आली. मात्र घरी जायचा निश्चय केला. कन्याकुमारीहून त्यांनी पायीच प्रवास केला. प्रवासात त्यांना जागोजागी स्थलांतरित कामगार भेटत होते. तेथून नागरकॉईल, त्रिवेंद्रम, कोचीन, पालकड, कोईम्बतुर, बंगळुरु, हैदराबाद असा त्यांनी पायी प्रवास करत ते शनिवारी नागपूरला पोहोचले.अन् उत्तर प्रदेशकडे झाले रवानानागपुरात पांजरी येथील टोलनाक्यावर संघ स्वयंसेवक व स्थानिक नागरिकांकडून सुरू असलेल्या सेवाकार्यात त्यांची भोजनाची सोय झाली व स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनच्या चमूकडून उपचारदेखील झाले. रविवारी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस होत असतानाच नेमके एक वाहन परवानगीने अलाहाबादकडे निघाले होते. त्यात संंबंधित व्यक्तीची व्यवस्था झाली. खऱ्या अर्थाने नागपूरने मला आशेचा किरण दाखविला, अशी भावना व्यक्त करताना त्यांचे डोळे पाणावले होते.तेलंगणा, महाराष्ट्रात जास्त आपुलकीमला २०१८ साली क्षयरोगदेखील झाला होता. कन्याकुमारीहून शेकडो किलोमीटर पायी चालल्यानंतर कफचा त्रास व्हायला लागला. धाप लागल्यावर काही काळ विश्रांती घ्यायचो. मात्र त्रिवेंद्रमला पोलिसांनी यासाठी मारले. बसू नका केवळ चालत रहा असे पोलिसांचे म्हणणे होते, असे त्यांनी सांगितले. वाटेत शेतकऱ्यांचे व लहानलहान गावातील लोकांचे सहकार्य झाले. तेलंगणा व महाराष्ट्रात जास्त आपुलकी दिसून आली, असेदेखील त्यांनी सांगितले.