नागपूर : पूजा करून एक लाखाच्या मोबदल्यात १ कोटी रुपये परत करण्याचा दावा करणारा पंकज चौधरी अखेर पोलिसांच्या हाती लागला. मागील अनेक दिवसांपासून तो तांत्रिक पूजा करून देण्याचे सांगून फसवणूक करीत असल्याच्या गुन्ह्यात सक्रिय आहे.
पंकज बेरोजगार आहे. तो सहज नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढतो. पूजा केल्यास मोठी रक्कम मिळणार असल्याची बतावणी करतो. काजीसोबत ओळख झाल्यानंतर त्याने मोठा हात मारण्याचे ठरविले. त्याने तीन साथीदारांना कामानिमित्त नागपूरला चालण्यास सांगितले. मोठी रक्कम मिळणार असल्याचे सांगितले. तो १५ जूनला पवन अलोने, पवन लोहकरे आणि गोलू पेचेसोबत नागपूरला आला. काजीची भेट घेऊन परत गेला. त्यानंतर दोघेही दुसऱ्या दिवशी पुन्हा परत आले. तो पवन अलोनेसोबत काजीच्या कार्यालयात गेला. त्याने सांगितल्यानुसार काजीने पूजेत ७.११ लाख रुपये ठेवले. ते पैसे घेऊन तो थेट स्मशानातून फरार झाला. वणीला परतल्यानंतर त्याने आपल्या साथीदारांना त्यांचा वाटा दिला. पोलिसांच्या हाती लागल्यानंतर त्याचे साथीदार आपण निर्दोष असल्याचे सांगत आहेत. त्यांच्या मते पंकजने त्यांना फसवणुकीची माहिती दिली नाही. तपास उपनिरीक्षक माडेवार करीत आहेत.
मोठा हात मारण्याच्या नादात फसला
आतापर्यंत तो ५ ते १० हजार रुपयांनीच नागरिकांची फसवणूक करीत होता. मात्र यावेळी मोठा हात मारण्याच्या नादात त्याचे कृत्य उघड झाले. पंकज आणि त्याच्या तीन साथीदारांची विचारपूस केली असता हा खुलासा झाला. दरम्यान धंतोली पोलिसांनी पंकज आणि त्याच्या साथीदारांकडून ५ लाख रुपये जप्त केले आहेत.
असा आहे घटनाक्रम
जाफरनगर येथील रहिवासी बांधकाम ठेकेदार आरिफुद्दीन काजी (४९) यांची फसवणूक करून पंकजने त्यांचे ७.११ लाख रुपये चोरून नेले होते. पूजा करून १ लाखाच्या मोबदल्यात १ कोटी रुपये देण्याची बतावणी केली होती. १६ जूनला कथित पूजा केल्यानंतर तो स्मशानात निंबू ठेवण्यासाठी काजी यानना घेऊन गेला व तेथूनच फरार झाला होता. धंतोली पोलिसांनी काजीची चौधरीसोबत ओळख करून देणाऱ्या दंतेश्वर महाराणा याची चौकशी केली. त्यानंतर पंकज चौधरी (अहेरी), पवन लोहकरे, पवन अलोने (वणी) आणि गोलू ऊर्फ अक्षय पेचे (वरोरा) यांना अटक करण्यात आली.
...