नागपूर : भोजन न दिल्यामुळे एका गुंडाने वार करून आपल्या साथीदाराला जखमी केल्याची घटना सिव्हिल लाइन्समधील मिठा निम दर्गाहजवळ बुधवारी सायंकाळी ६.३० वाजेदरम्यान घडली.
मिठा निम दरगाहजवळ नेहमीच भोजन वितरण करण्यात येते. भोजन घेण्यासाठी तेथे भिकारी तसेच असामाजिक तत्त्व गर्दी करतात. यात नशा करणाऱ्या व्यक्तींचाही समावेश असतो. बुधवारी सायंकाळी ६.३० वाजता नीलेश उर्फ गोलू मारुती कांबळे (२७) रा. जाटतरोडी हा वितरण केलेले भोजन घेऊन फुटपाथवर बसला होता. त्याने भोजन सुरू केल्यानंतर आरोपी प्रणय राजेश पात्रे (२८) रा. इंदोरा हा तेथे आला. त्याने गोलूला भोजन मागितले; परंतु गोलूने भोजन वितरण सुरू आहे तू घेऊन ये, असे त्याला सांगितले. त्यामुळे प्रणय संतप्त झाला. त्यांच्यात वाद झाला. दरम्यान, प्रणयने शिवीगाळ करून चाकूने गोलूच्या गळ्यावर वार केला. त्याला गंभीर जखमी करून प्रणय फरार झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. सीताबर्डी पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून प्रणयला अटक केली आहे. गोलू आणि प्रणयला सोल्युशनची नशा करण्याची सवय आहे. ते नेहमीच मिठा निम दर्गाह परिसरात फिरत असतात. त्यांच्यासारखे इतर गुन्हेगारही तेथे येतात. विधानभवन परिसरातील फुटपाथवर असामाजिक तत्त्व नेहमीच दिसतात. कठोर कारवाई करून यांचा बंदोबस्त केला जाऊ शकतो.
...........