वन विभाग अस्वस्थ : ‘जय’ गेला कुठे ? जीवन रामावत नागपूर मागील चार दिवसांपासून वन विभाग ‘जय’चा युद्धपातळीवर शोध घेत आहे. मात्र त्याचा अजूनपर्यंत कुठेही सुगावा लागलेला नाही. यामुळे पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हृदयाचे ठोके वाढू लागले आहेत. जर ‘जय’सोबत काही वाईट घडले तर आपली खैर नाही, याची आता त्यांना चाहूल लागली आहे. यामुळे अख्खा वन विभाग अस्वस्थ झाला आहे. त्याचवेळी वन्यजीवप्रेमींचीसुद्धा चिंता वाढली आहे. वन्यजीवप्रेमींना ‘जय’ची प्रतीक्षा नागपूर : वन विभागाच्या मते, ‘जय’ हा १८ एप्रिल २०१६ पासून गायब झाला आहे. या दिवसापासून वन विभागाचा त्याच्याशी असलेला संपर्क तुटला आहे. दुसरीकडे त्याच दिवशी म्हणजे १८ एप्रिल २०१६ रोजी घेण्यात आलेला ‘जय’चा शेवटचा बोलका फोटो ‘लोकमत’कडे प्राप्त झाला आहे. तो या दिवशी पवनी वनपरिक्षेत्रातील फेटाळा बीटात सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास काही पर्यटकांना दिसून आला होता. यावेळी वन्यजीवप्रेमी पंकज देशमुख व नितीन रहाटे यांनी तब्बल पाऊण तास ‘जय’ला पाहण्याचा आनंद लुटला; शिवाय त्यांनी ‘जय’चे सुमारे २०० पेक्षा अधिक फोटोग्राफसुद्धा काढले. या वन्यजीवप्रेमींच्या मते, ‘जय’ हा त्या दिवशी फारच थकलेला आणि कमजोर दिसून येत होता, शिवाय त्याचे पोट खोल गेले होते. त्यावरून तो अनेक दिवसांपासून उपाशी असावा, असा भास होत होता. कदाचित भुकेने व्याकूळ झाल्यामुळे त्याची चाल मंदावली होती. कदाचित यामुळेच ‘जय’च्या चेहऱ्यावरील तो ताजेपणा, त्याचा रुबाब, त्याची चाल आणि ती डरकाळी कुठे तरी हरविल्यासारखे भासत होते, असेही पंक ज देशमुख व नितीन रहाटे यांनी सांगितले. त्याचवेळी वन विभाग हा ‘जय’ सुरक्षित आहे, असा प्रत्यक्ष दावा करीत आहे. निश्चितच ‘जय’ हा कुठेही असो, मात्र तो सुरक्षित असावा, अशीच सर्व वन्यजीवप्रेमींची इच्छा आहे. कारण ‘जय’च्या चाहत्यांचा फार मोठा वर्ग आहे. त्यामुळेच त्याला पाहण्यासाठी उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात पर्यटकांच्या रांगा लागत होत्या. शिवाय त्याला कुणी एकदा बिघतले की ‘जय’ ला पुन्हापुन्हा पाहण्याचा मोह आवरू शकत नव्हता आणि त्यामुळेच पर्यटक हा पुन्हा उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याच्या वाटेला लागत होता. यामुळेच अवघ्या तीन वर्षांत उमरेड-कऱ्हांडला संपूर्ण विदर्भातील पर्यटकांच्या आवडीचे प्रथम ‘डेस्टिनेशन’ ठरले होते. पर्यटकांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली होती. शिवाय यातून पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाच्या खजिन्यात कोट्यवधीची भर पडली. त्यामुळे ‘जय’ हा पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाला दुहेरी चिंतेत सोडून गेला आहे. (प्रतिनिधी) आता उमरेड-कऱ्हांडलाचे ‘ग्लॅमर’ कसे टिकणार उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातून ‘जय’ बाहेर होताच या अभयारण्याला मिळालेले ‘ग्लॅमर’ आता कसे टिकवायचे, हा आता पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयातील वरिष्ठ वन अधिकाऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळेच पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाने मागील तीन वर्षे ‘जय’ हा उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातून बाहेर जाऊ नये, यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले. शिवाय त्याच्यावर २४ तास वॉच ठेवण्यासाठी त्याला सर्वप्रथम १५ सप्टेंबर २०१५ रोजी रेडिओ कॉलरने सज्ज केले. मात्र ती कॉलर लगेच दोन महिन्यांत बंद पडली. यानंतर १७ मार्च २०१६ रोजी ‘जय’ ला पुन्हा नवीन कॉलर लावली. मात्र दुर्दैवाने तीसुद्धा महिनाभरात म्हणजे, १८ एप्रिल रोजी ‘फेल’ झाली. आणि कदाचित ‘जय’ ने सुद्धा हीच संधी शोधून अचानक उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याला रामराम ठोकला.
‘तो’ थकला, व्याकूळ झाला होता...
By admin | Published: July 25, 2016 2:24 AM