नागपूर : उशिरा रात्रीपर्यंत आयपीएलची मॅच बघितल्यानंतर कामठीतील एका युवा व्यावसायिकाने स्वत:च्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली. ही घटना आज मंगळवारी सकाळी उघडकीस आली. तेव्हापासून शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. आयुष अजय त्रिवेदी (२६, ऑरेंज सीटी, राजा रॉयलजवळ, नवीन कामठी) असे मृत तरुणाचे नावे आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अजय त्रिवेदी हे सावनेर-कामठी परीसरात बांधकाम साहित्य पुरवठा करण्याचे काम करीत होता. तो रेती व्यवसायात सक्रिय होता. त्यांच्याकडे काही ट्रक आणि पोकलँड अशी वाहनेही आहेत. गेल्या काही दिवसांपासून आयुष कर्जबाजारीपणामुळे तणावात राहत होता.
आयुषचे आई वडील आणि बहीण खाली तर आयुष पहिल्या माळ्यावर राहत होता. चर्चेनुसार, तो सोमवारी रात्री उशिरापर्यंत आयपीएलची फायनल पहात होता. मंगळवारी सकाळी चहा-नाश्त्याची वेळ होऊनही तो खाली आला नाही. आतून दार बंद असल्याने त्याला कुटुंबियांनी फोन केले. मात्र प्रतिसाद आला नाही. म्हणून आईने त्याच्या खोलीत डोकावून बघितला असता तो बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसला. कुटुंबियांनी आरडाओरड केल्याने शेजारची मंडळी धावली. त्यांनी लगेच पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर कामठी पोलिसांचा ताफा तसेच डीसीपी श्रवणकुमार दत्त एस. डीसीपी सुदर्शन, एसीपी खांडेकर,वरिष्ठ पुलिस निरीक्षक प्रमोद खोरे, पुलिस निरीक्षक सिडाम, एपीआय भातुकले, पीएसआई वारंगे घटनास्थळी पोहचले. फॉरेन्सिकचेही पथक बोलवून घेण्यात आले. त्यांनी आयुषच्या रूमची बारकाईने तपासणी करून तेथून पिस्तुल तसेच त्याचा मोबाईल जप्त केला. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी आयुषने कर्जबाजारूपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची नोंद केली. मात्र, व्यवसाय चांगला चालत असताना आयुषवर कर्ज कशाचे झाले होते, ते उघड झाले नाही.
क्रिकेट सट्ट्याचाच बळी ?
सूत्रांच्या माहितीनुसार, आयुषला क्रिकेट सट्ट्याचे व्यसन होते. चेन्नई आणि गुजरात संघात सोमवारी रात्री आयपीएलची फायनल मॅच झाली. या मॅचमध्ये त्याने पैसे लावले होते. मात्र, मॅच उलटल्याने आयुष लाखो रुपये हरला. लगवाडीची रोकड कुुठून द्यायची, बुकींना कसे सामोरे जायचे, असे त्याच्यावर दडपण आले. त्यातूनच त्याने आत्महत्या केली असल्याची चर्चा आहे. अवघ्या दोन आठवड्यात क्रिकेट सट्ट्याने घेतलेला हा तिसरा बळी आहे. यापूर्वी छापरूनगरातील खितेश वाधवानी याने क्रिकेट सट्ट्याचे कर्ज डोक्यावर चढल्याने बुकीच्या धाकामुळे गळफास लावून घेतला. तर, त्याची आई दिव्या यांनी विष घेऊन आत्महत्या केली.
पिस्तूल कुठून आलीआयुषने ज्या पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली, ती पिस्तूल आली कुठून, याचा शोध पोलीस घेत आहेत. कामठी-कन्हान, खापरखेडा भागात देशी कट्टे विकणाऱ्या अनेक टोळ्या आहेत. रेती माफियांकडेही सर्रास कट्टे आढळतात. मध्यप्रदेश, बिहार, झारखंड आणि उत्तरप्रदेशातून हे कट्टे नागपुरात आणण्यात येते. आयुषने पिस्तुल कुणाकडून घेतले होता, या प्रश्नासह अनेक मुद्दे पोलिसांकडून उघड झालेले नाही.