लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वातंत्र्यवीर सावरकरांप्रमाणे मराठीला नव्या शब्दांची देणगी देणाऱ्यात जर कुणाचे नाव आदराने घेतले जात असेल तर ते मारुती चितमपल्ली यांचे. निसर्गवाटेत अवघे आयुष्य घालविणाऱ्या या मूळ तेलुगू भाषिक निसर्गऋषीने तब्बल एक लाख शब्दमोती मराठी मातीला दिले. वन, वन्यजीव, वनस्पतींची खडान्खडा माहिती त्यांना आहे. त्यांचे हे सगळे संशोधन विदर्भातच झाले असल्याने त्यांना विदर्भाने ‘निसर्गवेडा’ ही बिरुदावली दिली. निसर्गाचा हा सगळा खजिना घेऊन म्हणा वा भविष्याकडे सोपवून ते आपल्या गृहनगराकडे अर्थात सोलापूरकडे प्रस्थान करत आहेत.वनांच्या अभ्यासात बरीच वर्षे विदर्भात घालविल्यानंतर मारुती चितमपल्ली रविवारी सकाळी नागपुरातून सोलापूरकडे प्रस्थान करत आहेत. आपले उर्वरित आयुष्य ते सोलापूरमध्ये आपल्या पुतण्याकडे घालविणार आहेत. त्यानिमित्ताने शनिवारी शेवाळकर कुटुंबीयांनी विदर्भवासीयांच्या वतीने त्यांच्या प्रस्थान सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. ज्येष्ठ लेखिका आशाताई बगे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी चितमपल्ली यांनी विदर्भातील संशोधनविषयक बऱ्याच आठवणींना उजाळा दिला. पक्षी, वन्यप्राणी म्हणा वा वनस्पती यांवरील लिखाण असो वा भविष्यवेधी विद्यार्थ्यांना शिकवणी असो यावर पुसटशा आठवणी ते व्यक्त करत होते. नागझिरा येथील वनसंपत्तीने मोहिनी घातल्यावरच आपल्या लिखाणाला नवे वळण मिळाल्याचे ते यावेळी म्हणाले. विदर्भाएवढी वनसंपदा जगात कुठेच नाही. मात्र, या संपदेचे संरक्षण करता आले पाहिजे, असे कोडे त्यांनी सोलापूरकडे जाताना या प्रस्थान निरोप समारंभात टाकले. यावेळी माहिती विभाग संचालक हेमराज बागूल, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, आशुतोष शेवाळकर, विजयाताई शेवाळकर, मनीषा शेवाळकर उपस्थित होते.जंगल वाचवणे आता तुमच्या हातात!विदर्भातील वनसंपदेवर भरभरून प्रेम करणाºया मारुती चितमपल्ली यांना विदर्भ सोडणे अत्यंत अवघड आहे, हे त्यांच्या एका भावनिक वाक्यावरून स्पष्ट होत होते. एवढे जंगल कुठेच नाही. ते विदर्भात आहे, ते सांभाळता आले पाहिजे. जंगल वाचवणे आता तुमच्या हातात आहे, या एका वाक्यावरूनच त्यांचा जंगलाविषयीचा लळा लक्षात येतो.
'निसर्गवेडा' ही बिरुदावली घेऊन 'ते' निघाले आपल्या गावाला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 7:34 PM
Maruti Chittampalli, Nagpur News मारुती चितमपल्ली यांना विदर्भाने ‘निसर्गवेडा’ ही बिरुदावली दिली. निसर्गाचा हा सगळा खजिना घेऊन म्हणा वा भविष्याकडे सोपवून ते आपल्या गृहनगराकडे अर्थात सोलापूरकडे प्रस्थान करत आहेत.
ठळक मुद्देमारुती चितमपल्ली यांचे नागपुरातून सोलापूरकडे प्रस्थान : सत्कार समारंभात रंगला आठवणींचा सोहळा