नागपूर : नागपुरात मंगळवारी परत एक खून झाल्यामुळे पोलीस यंत्रणेचा खरोखर वचक आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ज्या व्यक्तीची हत्या झाली तो तासाभराअगोदरच घरातून जावयासह काम शोधण्यासाठी बाहेर पडला होता आणि किरकोळ कारणावरून त्याचा जीव घेण्यात आला. गाडीसमोर आलेल्या कुत्र्याला हड हड करण्यावरून आरोपीचा त्याच्याशी वाद झाला व त्याने अल्पवयीन मुलासह चाकूने त्याचा गेम केला.
सुधाराम उर्फ रामा मंगल बाहेश्वर (४६, महाकालीनगर झोपडपट्टी) असे मृतकाचे नाव आहे. रामा हा मिस्त्री होता व त्याला दोन मुले-एक मुलगी आहे. मध्यप्रदेशातील बालाघाट येथून त्याचे जावई मेहतरलाल पंचेश्वर हे नागपुरात आले होते. ते मजुरीच्या कामासाठी आले होते व काम शोधण्यासाठी मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजता ते रामासोबत घराबाहेर पडले. दुचाकीने ते जात असताना घराजवळ गाडीसमोर एक कुत्रा आला. रामाने त्याला पळविण्यासाठी हड हड केले. त्याचवेळी तेथे आरोपी अमन नागेश चव्हाण (२२) हा एका अल्पवयीन मुलासोबत उभा होता.
अमनला वाटले की रामा त्यालाच पाहून हड हड म्हणत आहे. त्यावरून त्याचा रामासोबत वाद झाला व त्याने शिवीगाळ केली. यानंतर अल्पवयीन मुलाने रामावर दगडाने प्रहार केला व अमनने चाकूने वार करत गंभीर जखमी केले. आरडाओरड ऐकून रामाची पत्नी तेथे पोहोचली असता पती रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. अमन तेथून फरार झाला. अल्पवयीन मुलाने सर्व प्रकार रामाच्या पत्नीला सांगितला. ती पतीला ऑटोतून मेडिकलमध्ये घेऊन गेली. मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला व अमनचा शोध घेण्यात येत आहे.