योगेश पांडे नागपूर : परिचयातील व्यक्ती म्हणून एका चालकावर विश्वास ठेवणे कार रेंटल कंपनीच्या संचालकाला चांगलेच महागात पडले. एका आरोपीने त्यांच्याकडून पाच कार भाड्याने घेतल्या व त्या परस्पर गहाण ठेवत विश्वासघात केला. आरोपीने संचालकाला सव्वा वर्ष भाडेदेखील न देता सुमारे ६६ लाखांनी फसवणूक केली. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
सौरभ मनोज दारोकर (२८, साईनगर) यांचे जरीपटका येथे सिल्व्हर कॉल्ज या नावाचे कार रेंटल कार्यालय आहे. ते ज्यांना आवश्यकता असते त्यांन भाड्यावर कार पुरवतात. आरोपी प्रखर शिशीर तिवारी (२२, भिलगाव) हा त्यांच्याकडे चार वर्षांपासून कार भाड्याने घेण्यासाठी यायचा. त्यामुळे त्यांची ओळख होती. २७ नोव्हेंबर २०२१ ला प्रखर त्यांच्याकडे आला व टोयोटा इनोव्हा कार भाड्यावर घेऊन गेला. त्यानंतर त्याने काही महिन्यात सेल्टॉस व दोन होंडा सिटी कारदेखील नेल्या. प्रखरने काही दिवस नियमित भाडे दिले. मात्र त्यानंतर त्याने भाडे देणेदेखील बंद केले. तसेच संपर्कदेखील केला नाही. त्याला भाडे व कारबाबत सौरभ यांनी विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. अखेर सौरभ यांनी चौकशी केली असता प्रखरने परस्पर ३६ लाखांच्या कार गहाण ठेवल्याची बाब समोर आली. त्यांनी जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. मात्र कार व भाडे लगेच देतो असे आश्वासन प्रखरने दिल्याने त्यांनी तक्रार केली नाही. अखेर सौरभ यांनी त्याच्याविरोधात तक्रार केली व पोलिसांनी गुन्हा नोंदविला. प्रखरने सौरभ यांना ३० लाखांचे भाडे दिले नाही व एकूण ६६.५० लाखांची फसवणूक केली. पोलीस आरोपी प्रखरचा शोध घेत आहेत.