नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. मनोज पांडे यांनी विद्यार्थिनी व त्यांच्या सहकाऱ्यांकडून जिवाला धोका असल्याची तक्रार पोलिसांत केली आहे. संबंधित विद्यार्थिनींनी ७ ते ८ सहकाऱ्यांसह विभागात येऊन गोंधळ केल्याचा दावा डॉ. पांडे यांनी तक्रारीत केला आहे. पीएचडी संशोधनासाठी इच्छुक असलेल्या संबंधित विद्यार्थिनींनी डॉ. पांडे यांच्याविरोधात मानसिक छळवणुकीची तक्रार दिली होती व विद्यापीठाने यावर समितीदेखील बसवली होती.
नागपूर विद्यापीठात पीएचडी करण्यास इच्छुक असलेल्या दोन विद्यार्थिनींनी दिलेल्या तक्रारीवरून विद्यापीठाने समिती बसविली होती. समितीने चौकशीत त्यांच्या आरोपात तथ्य नसल्याचा निर्वाळा दिला होता. त्यानंतर विद्यार्थिनींची नोंदणी अद्यापपर्यंत झालेली नव्हती. डॉ. पांडे यांनी अंबाझरी पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनुसार २९ ऑगस्ट रोजी दोन विद्यार्थिनी व त्यांचे ७ ते ८ सहकारी विभागात आले व त्यांनी विभाग प्रमुखांच्या दालनात येण्याचा प्रयत्न केला. ते सुटीवर असल्याने दालन बंद होते. त्यामुळे रागाने दालनाच्या दरवाजावर संतापाने प्रहार करत ते निघून गेले. सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झाल्यानंतर त्यांनी अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. यासंबंधात त्यांनी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनादेखील कळविले व त्यांच्या परवानगीनंतरच पोलिसांत तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दुसरीकडे दोन विद्यार्थिनींनीदेखील अंबाझरी पोलीस ठाण्यात धाव घेत डॉ. पांडे यांच्याविरोधात मानसिक छळवणुकीची तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात डॉ. पांडे किंवा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. चौधरी यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क होऊ शकला नाही. पोलिसांनी अद्याप कुणाविरोधातदेखील गुन्हा नोंदविलेला नाही.