नागपूर : लिफ्टच्या चॅनल गेटमध्ये डोकं फसल्याने एका बाल मजुराचा मृत्यू झाला. ही घटना जगनाडे चौक येथील अनुसया मंगल कार्यालयात घडली. पोलिसांनी मंगल कार्यालय संचालक दाम्पत्यासह चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
संघर्षनगर येथील १६ वर्षीय सुजल दिलीपकुमार गुप्ता हा विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाला होता. त्याच्या वडिलाची छोटी दुकान आहे. शाळा बंद असल्याने व कुटुंबीयांची आर्थिक परिस्थती कमकुवत असल्याने, सुजल कॅटरिंगचे ठेकेदार कन्हैय्या पटेल यांच्याजवळ काम करीत होता.
२० नोव्हेंबर रोजी अनुसया मंगल कार्यालयात एक लग्नसमारंभ होते. त्या लग्नाच्या कॅटरिंगचे काम कन्हैय्या पटेल याला दिले होते. सुजल सकाळी ११.३० वाजता कॅटरिंगचे सामान घेऊन लिफ्टने जात होता. याच दरम्यान तो लिफ्टच्या चॅनल गेटमध्ये फसला. त्याच्या डोक्यावर गंभीर जखम झाली. लिफ्ट मॅन नसल्याने तत्काळ घटनेची माहिती होऊ शकली नाही. सुजलला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.
नंदनवन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करीत चौकशी सुरू केली. चौकशीत कॅटरिंग ठेकेदार व मंगल कार्यालयाच्या संचालकाची निष्काळजीपणा समोर आला. लिफ्टमध्ये सेफ्टी डोअर नव्हते. लिफ्ट मॅनही नव्हता. त्या आधारे नंदनवन पोलिसांनी मंगल कार्यालयाचे संचालक संजय काळे, त्यांची पत्नी जयश्री काळे, मॅनेजर हरीश पिल्ले व कॅटरिंग ठेकेदार कन्हैय्या पटेल याच्याविरुद्ध निष्काळजीपणा बाळगल्या प्रकरणी व बाल न्याय अधिनियमांन्वये गुन्हा दाखल केला.