विमानतळावर कंत्राटदाराची मनमानी : शुल्क फलकावर चुकीची माहिती गाड्यांच्या पार्किंगसाठी अवैध वसुली नागपूर विमानतळावर पार्किंगसाठी कंत्राटदार अवैध वसुली करीत आहे. विमानतळावर गेल्या काही दिवसांपूर्वी पार्किंगसंदर्भात नवीन सिस्टिम सुरू झाली आहे. त्यानुसार झोन-१ मध्ये प्रीमियम पिकअप अॅण्ड ड्रॉप परिसर तयार केला आहे तर झोन-२ ला जनरल पार्किंग परिसर घोषित केला आहे. या दोन्ही ठिकाणी आकारण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या पार्किंग शुल्कासंदर्भात प्रवाशांमध्ये संभ्रम आहे. प्रीमियम पिकअप अॅण्ड ड्रॉप परिसरात कारच्या प्रवेशानंतर पहिल्या १५ मिनिटांपर्यंत २०० रुपये शुल्क वसूल करण्यात येत आहे. त्यानंतर प्रत्येक ३० मिनिटाकरिता १०० रुपये वसुलीची एमआयएलने कंत्राटदाराला सवलत करून दिली आहे. पण फलकावर नमूद केल्यानुसार १५ मिनिटानंतर १०० रुपये वसुलीची तरतूद आहे तर जनरल पार्किंग परिसरात पहिल्या पाच मिनिटे नि:शुल्क पार्किंगची सोय आहे. त्यानंतर प्रत्येक ३० मिनिटांसाठी १०० रुपये आकारण्यात येत आहे. पण फलकावर हे शुल्क प्रत्येक १५ मिनिटांसाठी नमूद केले आहे. नवीन नियमानुसार प्रत्येक १५ मिनिटानंतर १०० रुपये आकारण्याची तरतूद होती. पण लोकांनी तक्रार केल्यानंतर त्याचा कालावधी १५ मिनिटांनी वाढवून ३० मिनिटे केला. त्याला १५ ते २० दिवस झाले आहेत, पण फलकावर जुने शुल्क झळकत आहेत. संबंधित कंत्राटदाराने फलक अपडेट केलेले नाही. त्यामुळे बूथसमोरच लोकांचा गार्डसोबत वाद होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. सुरक्षेच्या कारणावरून अवैध कमाईवर लक्ष विमानतळ प्रशासनाने सांगितले की, सुरक्षेच्या दृष्टीने प्रीमियम पिकअप अॅण्ड ड्रॉप परिसर बंद करण्याचा मानस आहे. पण कुणाला नाईलाजाने या परिसरात जाण्याची इच्छा असेल तर त्याला निर्धारित शुल्क देऊन जावे लागेल. सुरक्षेच्या दृष्टीने असे करता येते का वा कंपनीचे कमाईवर लक्ष आहे, हे गंभीर प्रश्न आहेत. जर असे करता येत असेल तर जास्त शुल्क देऊन एखाद्या कारने या परिसरात प्रवेश केला तर विमानतळाची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. या दुहेरी भूमिकेमुळे विमानतळाचे सुरक्षेवर लक्ष नसून कमाईची नियत दिसून येते. सुरक्षा भेदने सोपे नागपूर विमानतळावर टर्मिनल इमारतीपासून धावपट्टी जवळच आहे. याशिवाय पार्किंग बूथ टर्मिनल इमारतीसमोरच लावण्यात आले आहेत. येथे सीआयएसएफच्या दोन जवानांसह अन्य सुरक्षा गार्ड तैनात आहेत आणि बॅरिकेडस् लावले आहेत. अशास्थितीत सुरक्षा भेदने सोपे असून मोठी दुर्घटना टाळता येणार नाही. पूर्वी पार्किंग बूथ टर्मिनल इमारतीपासून दूर होता आणि त्यामुळे इमारत सुरक्षित होती. खासगीकरणाऐवजी श्रेणीकरणावर जास्त लक्ष विमानतळाच्या खासगीकरणाचे काम मिहान इंडिया लिमिटेडकडे आहे. त्यासाठी पाच वर्षांचा कालावधी दिला होता. पण नऊ वर्षांनंतरही खासगीकरणाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. या प्रक्रियेला गती देण्याऐवजी विमानतळ प्रशासन श्रेणीकरणावर ऊर्जा खर्च करीत आहे. एकीकडे सरकार व्हीआयपी संस्कृतीला संपविण्याच्या दिशेने काम करीत आहे, तर दुसरीकडे नागपूर विमानतळावर पार्किंगला वेगवेगळ्या श्रेणीत विभाजित करीत आहे.
पार्किंगची अवैध वसुली प्रवाशांसाठी डोकेदुखी
By admin | Published: May 18, 2017 2:44 AM