- अप्पर-डिप्पर नियमाचा अभाव : दीपवून टाकणाऱ्या लख्ख प्रकाशाने अपघातास आमंत्रण
प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रात्रीला वाहनांच्या हेडलाईट्सचा उजेड इतका असतो की त्यामुळे विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनचालकाचे डोळेच दिपतात. बरेचदा हेडलाईट्सच्या लख्ख प्रकाशामुळे, अचानक डोळ्यासमोर अंधारी येते आणि आपले वाहन कुठे चालले किंवा आपल्यापुढे काय आहे, याचा अंदाज त्याला येत नाही. परिणामी भयंकर अपघाताला तो बळी ठरतो. मात्र, अशा अपघाताच्या नोंदी सर्वेक्षणात आढळत नसल्याचे दिसून येते.
प्रत्येक जिल्ह्यात आणि विशेषत: शहरी भागात वाहनांची संख्या प्रचंड वाढत आहे. एकट्या नागपूर विभागात प्रादेशिक परिवहन विभागाच्या नोंदीनुसार २२ लाखाच्या जवळपास हरतऱ्हेची वाहने आहेत. ही वाहने बाळगताना पीयूसी, लायसन्स, विमा आदी अनेक नियम सांगितले जातात. मात्र, यात महत्त्वाचा असा वाहतुकीचा अप्पर-डिप्पर हा नियम अस्तित्वात नसल्याचे दिसून येते. त्याचा परिणाम रात्रीला वाहनांच्या लख्ख प्रकाशामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक बळावते.
अप्पर-डिप्पर म्हणजे काय?
या नियमांतर्गत शहराच्या आत वाहन चालविताना वाहनांच्या हेडलाईट्समध्ये असलेल्या दोनपैकी मर्यादित अंतरात रस्त्यावरच उजेड पाडणारा लाईट लावणे अपेक्षित होते. याला डिप्पर म्हटले जाते. जेणेकरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहन चालकाला त्रास होणार नाही. महामार्गावर वाहने वेगाने धावतात आणि रस्त्यावरील दूरवरची बाजू लवकरच दिसावी या हेतूने हेडलाईट्समधील दोनपैकी लांबवर उजेड पाडणारा लाईट लावणे अपेक्षित होते. याला अप्पर म्हटले जाते.
लाईटवर काळा रंग किंवा कॅप
काही वर्षापूर्वी दुचाकी असो वा चारचाकी, सर्वच प्रकारच्या वाहनांच्या हेडलाईट्सवरील अर्धा भाग काळ्या रंगाने रंगवलेला आढळत होता किंवा पर्याय म्हणून हेडलाईट्सवर अर्धा भाग झाकेल अशी कॅप लावली जायची. तिनचाकी ऑटोच्या हेडलाईटवर अशी कॅप हमखास आढळत असे. आता हा प्रकार आढळत नाही. वाहतुकीचा अप्पर-डिप्पर हा नियम यात लागू होता आणि हा कायदा पाळला गेला नाही तर संबंधित चालकाला दंड भरायला लागायचा.
ना काळा रंग ना अप्पर-डिप्परची यंत्रणा
आताची बहुतांश वाहने स्टायलिश प्रकारातील आहेत. त्यामुळे, हेडलाईट्समध्ये केवळ एकच लाईट असतो. दुचाकींमध्ये ही स्थिती आहे. चारचाकी किंवा जड वाहनांमध्ये आताही हेडलाईट्समध्ये दोन लाईट्स आढळून येतात. मात्र, अप्पर-डिप्पर हा कायदाच नसल्याने सरसकट वाहन चालक लख्ख प्रकाश पाडणारे लाईट्सच वापरताना आढळतात.
वाहन उत्पादकांना सूचना
काही वर्षापूर्वी एका नागरिकाच्या तक्रारीवरून अप्पर-डिप्पर हा नियम अस्तित्वात आला होता. मात्र, त्यानंतर परिवहन विभागाने वाहन उत्पादक कंपन्यांना सूचना देऊन अप्पर-डिप्परची गरजच पडणार नाही, अशी हेडलाईट व्यवस्था वाहनांमध्ये इनबिल्ट करण्यास सांगितले होते. कंपन्यांनी ती सूचना पाळली. मात्र, अनेक हौशी वाहनचालक जास्त प्रकाशासाठी वाहनांचे लाईट बदलून टाकतात. त्यामुळे, रात्रीला वाहनांच्या प्रकाशाचा त्रास होत असेल. सद्यस्थितीत मात्र अप्पर-डिप्पर लाईट्सचा नियमच नसल्याचे परिवहन विभागातील एक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
या नियमाची गरज आता भासू लागली आहे
फार पूर्वी अप्पर-डिप्पर लाईट्सचा नियम होता. आता मात्र हा नियम बाजूला करण्यात आला आहे. वाहनचालकांच्या मनमानीमुळे अनेक अपघात होत आहेत. त्यामुळे, लाईट्सच्या नियोजनाबाबत अप्पर-डिप्परचा कायदा परिवहन विभागाने पुन्हा लागू करण्याची गरज निर्माण झाली आहे.
- रवींद्र कासखेडीकर, जनाक्रोश (रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करणारी संघटना)
नागपूर विभागात वाहनांची संख्या (नागपूर पूर्व, नागपूर शहर व वर्धा)
दुचाकी - १७,४९,६५०
मोटर कार्स - १,८५,०३८
जीप - ४५,१५६
पॅसेंजर रिक्षा - २७,५१४
डिलिव्हरी व्हॅन्स - ४९,३४६
गुड्स ट्रक - १९,०४७
इतर - ५७,१३०
एकूण - २१,३२,८८१
(आकडेवारी ३१ जानेवारी २०२१ नुसार)
..................