नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील कुख्यात बुकी बंटी ज्यूस ऊर्फ सचिदानंद खुबानी याच्या क्रिकेट सट्टेबाजीचा पर्दाफाश करून शनिवारी रात्री त्याला त्याच्या भाच्यासह जरीपटका पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे, रविवारी सकाळीच बंटी जामिनावर बाहेर आला आणि नंतर त्याने तसेच त्याच्या साथीदारांनी रविवार, सोमवारच्या सामन्यावर बिनबोभाटपणे कोट्यवधींची सट्टेबाजी केली. बुकींच्या निर्ढावलेपणाचा प्रत्यय देणाऱ्या या घडामोडीची बुकी बाजारात उलटसुलट चर्चा आहे.
‘लोकमत’ने गेल्या दोन महिन्यात अनेकदा कुख्यात बंटी ज्यूससह शहरातील अनेक बुकींच्या सट्टेबाजीचा पर्दाफाश करणारे वृत्त प्रकाशित केले. ते ध्यानात घेत पोलिसांनी अनेक दिवसांपासून बुकींवर नजर ठेवली होती. त्यानुसार, पोलिसांनी काही दिवसांपूर्वी डझनभर बुकींवर सर्जिकल स्ट्राइक केला होता. नेमक्या वेळी भ्रष्ट टिपरची साथ मिळाल्याने बंटी ज्यूस, शैलू पान, कम्मो, पंकज कडी-समोसा, अतुल धरमपेठसह अनेक बडे बुकी पोलिसांच्या कारवाईतून सटकले होते. त्यानंतर शहरातील पाचही झोनमध्ये अनेक बुकींना बोलवून पोलिसांनी सज्जड दम दिला. यावेळी बंटी ज्यूससह अनेक बुकींनी ‘अपना काम बंद है’ असा कांगावा केला होता.
दरम्यान, बंटी ज्युसचे बुकिंग त्याचा भाचा कुणाल ऊर्फ मोंटू मंगलानी बंटीच्या दुकानातून चालवित असल्याची माहिती कळताच जरीपटका पोलिसांनी या ज्यूस कम आइस्क्रीम पार्लरच्या आडून चालणाऱ्या क्रिकेट सट्टा अड्ड्यावर शनिवारी रात्री छापा घातला. यावेळी कुख्यात बंटी आणि कुणाल ऊर्फ मोंटू पोलिसांच्या हाती लागले, तर त्यांचा कामठीतील साथीदार भरत मतनानी फरार झाला.
जरीपटका पोलिसांनी रविवारी सकाळी बंटीला जामिनावर मोकळे केले आणि त्याने, शैलू कुक, पंकज कडी तसेच साथीदारांनी नंतर अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड तसेच पाकिस्तान विरुद्ध स्कॉटलंडमध्ये झालेल्या सामन्यावर कोट्यवधींची सट्टेबाजी केल्याचे वृत्त आहे. उत्तर नागपूरच नव्हे तर मध्य भारतातील अनेक बुकींचा करोडोंच्या लेणदेणचा कारभार सध्या जरीपटक्यातील ‘हेडक्वार्टर’मधून सुरू असल्याचे समजते. पोलिसांनी कसून चाैकशी केल्यास सट्टेबाजीच्या रॅकेटचा धक्कादायक खुलासा होण्याची शक्यता आहे.
ममतानीसह अनेक बुकी अंडरग्राऊंड
पोलिसांच्या कारवाईचे संकेत मिळताच अनेक बुकी ‘पोलिसांच्या भाषेत अंडरग्राऊंड’ होतात. मात्र, पोलिसांच्या नजरेत न पडता (गुप्तस्थळावरून) त्यांची खयवाडी सुरूच असते. बंटी ज्यूसवर कारवाई होताच भरत ममतानीसह अनेक बुकी अशाच प्रकारे नजरेत न पडता गेल्या दोन दिवसांपासून बिनबोभाटपणे कोट्यवधींच्या सट्ट्याची खयवाडी करत असल्याची सूत्रांची माहिती आहे.