नागपूर : भरधाव वाहने चालविणारी तरुणाई हेल्मेटच्या वापराविना अपघातात गंभीर जखमी होऊन आयुष्यभर अपंगत्वाला किंवा मृत्यूला समोर जात आहे. याच्या जनजागृतीसाठी आरटीआने गुरुवारी बाईक रॅली काढली. ‘डोके आहेत सर्वात नाजूक, हेल्मेट लावून व्हा जागरूक’, अशा घोषणा देत लक्षही वेधले.
नागपूर शहर व ग्रामीण प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय आणि पूर्व नागपूर उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्यावतीने ‘रस्ता सुरक्षा अभियाना’निमित्त बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शहर आरटीओ कार्यालयातून निघालेली ही रॅली पूर्व आरटीओ कार्यालयाला भेट देत ग्रामीण आरटीओ आणि नंतर शहर आरटीओ कार्यालयात परत आली. ही रॅली प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गीते यांच्या मार्गदर्शनाखाली उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भूयार, राजेश सरक, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके, अशफाक अहेमद यांच्या नेतृत्वात निघाली. रॅलीमध्ये मोटार वाहन निरीक्षक, सहायक मोटार वाहन निरीक्षक व कर्मचारी सहभागी झाले होते.