माेवाड : लता मंगेशकर हाॅस्पिटल डिगडाेह, हिंगणाच्यावतीने माेवाड (ता. नरखेड) येथील नगरपरिषद उच्च माध्यमिक शाळेच्या मैदानावर नि:शुल्क राेग निदान व भरती तसेच रक्तदान शिबिराचे नुकतेच आयाेजन करण्यात आले हाेते. त्यात १९५ नागरिकांच्या आराेग्याची तपासणी करण्यात आली असून, यातील ११० रुग्णांची पुढील उपचारासाठी निवड करण्यात आली. शिवाय, १५ तरुणांनी रक्तदान केले.
या शिबिरात लता मंगेशकर हॉस्पिटलमधील शल्यचिकित्सक तसेच बालरोग, अस्थिरोग, नाक,कान, घसा, पाेट, दंत, नेत्ररोग तसेच अन्य विभागातील तज्ज्ञ डाॅक्टरांनी नागरिकांची आराेग्य तपासणी केली. यात ११० रुग्णांची पुढील उपचारासाठी निवड करण्यात आली असून, त्यांच्यावर लता मंगेशकर हाॅस्पिटलमध्ये माेफत उपचार व शस्त्रक्रिया केली जाणार असल्याचे तसेच त्यासाठी आवश्यक असलेल्या काही चाचण्या माेफत तर काही चाचण्यांच्या खर्चामध्ये ५० टक्के सवलत दिली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. याप्रसंगी काेराेना काळात सेवा प्रदान करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा काेविड याेद्धा म्हणून गाैरव करण्यात आला. शिबिराचे उद्घाटन माजी आमदार डाॅ. आशिष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष सुरेश खसारे, पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी राऊत, दिनकर राऊत, रवींद्र वैद्य, डॉ. सुधीर साठोणे, दीपक बेले, पुरुषोत्तम बागडे, इस्माईल शेख, रवी माळाेदे, हिराचंद कडू, नामदेव वाडबुधे, मुख्याध्यापक दारोकर, फिरोज दिवाण, पुष्पा लुंगे, रमेश राजगुरू, डॉ. देवके, डॉ. किशोर ढोबळे, डॉ. केतन दागडिया, डॉ. रामटेके, मीना पवार, शामल मेंढे, बी. डी. मांढळे उपस्थित हाेते. यशस्वीतेसाठी लेखराज बोरकर, गोलू डुहिजोड, ललित खंडेलवाल, सुनील चुऱ्हे, दिलीप बनाईत, रमेश जिचकार यांनी सहकार्य केले. शिबिरात स्थानिक व परिसरातील गावांमधील नागरिक सहभागी झाले हाेते.