लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमणाच्या काळातच विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार, हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. परंतु दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही, असा धोक्याचा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे. त्यामुळे हा विभागही अधिवेशनासाठी सकारात्मक नसल्याचेच दिसत आहे.
नागपुरातील हिवाळी अधिवेशनाची तयारी सुरू असतानाच हिवाळी अधिवेशन मुंबईत आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात घेण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत. अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी नागपुरात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली होती.
विधिमंडळ सचिव राजेंद्र भागवत यांनीही मंमळवारी या संदर्भात कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय होणार असले म्हटले आहे. आरोग्य विभागाने हिवाळी अधिवेशन नागपुरात घेण्यासंदर्भात प्रतिकूल मत दिले आहे. पुणे आणि नाशिकमधील उदाहरण त्यांनी दिले. गणेशोत्सव काळात तिथे वेगाने कोरोनाचे संक्रमण वाढले. आता दिवाळीचे दिवस आहेत. नागरिक घराबाहेर मोठ्या संख्येने पडत असल्याने संक्रमण वाढण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही.
विधिमंडळ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपुरात अधिवेशन झाले तर, प्रत्येकच व्यक्तीची आरटी-पीसीआर टेस्ट करावी लागेल. यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडणार आहे. अधिवेशन कुुठे भरवायचे याचा अंतिम निर्णय बीएसी घेईल. मात्र आरोग्य विभागाचा अंदाजही विचारात घ्यावा लागणार आहे. या वेळेचे हिवाळी अधिवेशन मुंबईतच होईल, असा विश्वास काही अधिकाऱ्यांनी नाव न उघड करण्याच्या अटीवर व्यक्त केला आहे.
तयारी मंदावली
दरवर्षी तयारीला मोेठा वेग येत असतो. या वेळी नोव्हेंबर उजाडला तरी ती मंदावलेली दिसत आहे. अद्याप अनेक कामांना सुरुवात झालेली नाही. फक्त विधानभवनाची नवीन आणि आमदार निवासच्या क्रमांक एक या इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आहे. खरे तर या कामांना आधीपासूनच प्रारंभ झाला होता. विधान भवनात आजही टेस्टिंग सेंटर आणि डॉक्टरांची निवासस्थाने कायम आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मते, परिस्थिती स्पष्ट होताच वर्क ऑर्डर दिले जातील.