लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर जिल्हा प्रशासनाने आता संभावित तिसऱ्या लाटेच्या नियंत्रणाची रणनिती सुरू केली आहे. या अंतर्गत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या उपस्थितीत आयएमए पदाधिकारी, नाक-कान-घसा व बाल रोग तज्ज्ञांशी चर्चा झाली. या दरम्यान ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था सक्षम व सुदृढ करण्यावर भर देण्यात आला.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.डी.एस. शेलोकार उपस्थित होते. इंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी व ग्रामीण भागात काम करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांशी ऑनलाइन चर्चा झाली. यानंतर म्यूकर मायकोसिससंदर्भात गठीत टास्क फोर्ससोबतही चर्चा झाली. डॉ. प्रशांत निखाडे, डॉ. रामकृष्णा शिनॉय,डॉ. मिलिंद भुरसंडी,डॉ. आशिष दिसावाल उपस्थित होते. यावेळी इंडेक्शन नसल्याने पर्यायी उपचार, ग्रामीण डॉक्टरांना प्रशिक्षण या विषयावरही चर्चा झाली. त्याचप्रकारे डॉ. सतीश देवपुजारी व डॉ. वसंत खळतकर यांच्या उपस्थितीत बालरोग तज्ज्ञांशीही चर्चा झाली. यावेळी तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता संक्रमित मुलांच्या उपचारासाठी कॉमन प्रोटोकॉल तयार करण्यावर तज्ज्ञांनी सहमती दर्शविली.