- तरुण प्रौढ कोण आहेत?
तरुण प्रौढची व्याख्या अस्पष्ट आहे. एका अभ्यासानुसार, २० ते ४९ वर्षे वयोगटातील लोकांना यात समाविष्ट केले जाते. या वयोगटात ११०/७५ रक्तदाबाची पातळी जोखीम वाढविण्यास कारणीभूत ठरते. उच्च रक्तदाबामुळे आजार गंभीर होण्याचे प्रमाण एशियाई आणि भारतामध्ये जास्त आहे.
- तरुण प्रौढांमध्ये रक्तदाब कधी तपासायला हवा?
१८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांनी नियमितपणे रक्तदाब तपासणे आवश्यक आहे. यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या लवकर सापडण्याची शक्यता असते. एकदा निदान झाल्यास त्यावर औषधोपचार व योग्य जीवनशैली आत्मसात करून गंभीरता टाळता येते.
- तरुण प्रौढांमध्ये उच्च रक्तदाब येण्याचे धोकादायक घटक?
आहारात खूप जास्त मीठ, शारीरिक हालचालींचा अभाव आणि सतत ताणतणावात राहणे ही सामान्य कारणे आहेत. याशिवाय, अधिक साखर, धूम्रपान, तंबाखूचे व्यसन, अपुरी झोप, आळशीपणा हीसुद्धा कारणे आहेत. आजच्या टेक्नोसेवी तरुणांना सूर्यप्रकाश कमी मिळतो. सोबतच चरबीयुक्त पदार्थांचा अधिक वापर, एकाच बैठकीत संपूर्ण वेबसीरिज पाहणे आदी कारणांमुळेही उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो.
-उच्च रक्तदाबाच्या निदानासाठी या तपासण्या आवश्यक?
डॉक्टरांना न विचारता स्वत:हून घेतलेल्या औषधी, गर्भनिरोधक गोळ्या उच्च रक्तदाबाला कारणीभूत ठरू शकतात. यामुळे याची तपासणी आवश्यक ठरते. याशिवाय, पेन किलर, स्टिरॉइड्स, कोकेन, हर्बल ड्रग्सची माहिती घेणेही महत्त्वाचे ठरते. मूत्रपिंडाला होणाऱ्या रक्ताच्या पुरवठ्याची, मूत्रपिंडाच्या कार्याची चाचणी आणि काही ‘एंडोक्रिन’ आजाराची चाचणी करण्यास सांगितले जाते. काही प्रकरणांमध्ये ‘फेओक्रोमोसायटोमा’, ‘रेनल आर्टरी स्टेनोसिस’, ‘हायपरल्डोस्टेरॉनिझम’ चाचण्यादेखील केल्या जातात.
-रक्तदाबाचे व्यवस्थापन कसे?
रक्तदाबाचे व्यवस्थापन करण्यासाठी शारीरिक हालचाली वाढवायला हवे. याशिवाय, वजन नियंत्रणात ठेवणे, तंबाखूपासून दूर राहणे, अल्कोहोलचे सेवन कमी करणे आणि ताणतणावाचे व्यवस्थापन करणे उपयुक्त ठरते. रोज ३० मिनिटे गतीने चालणे आणि मैदानी खेळ खेळल्यानेही रक्तदाब कमी करण्यास मदत होते. आहाराकडे लक्ष देण्याचीदेखील शिफारस केली जाते. यात फळे, भाज्या, कमी चरबीयुक्त पदार्थांचा समावेश असायला हवा. दररोज मिठाचे सेवन कमीत कमी ६ ग्रॅमपेक्षा कमी असायला हवे. फास्ट फूड, अधिक चहा-कॉफी, ‘एयरेटेड ड्रिंक्स’ टाळायला हवे. पुरेशी झोप, योग आणि ध्यानदेखील फायदेशीर ठरतो.
- तरुण प्रौढांमध्ये औषधोपचार?
तरुण प्रौढांमध्ये उच्च रक्तदाबाची लक्षणे नेहमीच दिसून येत नसल्याने त्यांच्यात औषधोपचार टाळण्याचे किंवा अनियमित घेण्याचे प्रमाण मोठे आहे. परंतु योग्य उपचार करून रक्तदाब १२०/८० ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. योग्य जीवनशैली व औषधांद्धारे हे शक्य होते.
- उपचाराची पद्धत?
काही तरुण प्रौढांमध्ये लठ्ठपणा, मधुमेह किंवा ‘प्री-डायबिटीज’, ‘स्लीप अॅपनिया’, तणाव, नैराश्य, उच्च कोलेस्ट्रॉल, मादक पदार्थांच्या सेवनाची समस्या असते. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन डॉक्टर उपचाराची पद्धत ठरवितात.
- तंत्रज्ञानाचे योगदान?
उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाचे योगदान महत्त्वाचे ठरते. यात काही ‘गॅझेट्स’ आणि ‘मोबाइल अॅप’चा समावेश आहे. सध्याची युवापिढी टेक्नोसेवी असल्याने त्यांनी याचा वापर करायला हवा. हे करत असताना त्याच्या मर्यादादेखील लक्षात घेतल्या पाहिजेत.