- उच्च रक्तदाबाचे सर्वात सामान्य लक्षणे?
कोणतेही लक्षणे नसणे हेच सर्वात सामान्य लक्षण आहे. उच्च रक्तदाब असलेल्या अनेक महिला, गृहिणी, नोकरी पेशातील स्त्रिया सामान्य पद्धतीने काम करीत राहतात. संपूर्ण वेळ व्यस्त राहूनही त्यांना ‘हायपरटेन्शन’ असल्याची किंचितही कल्पना येत नाही. त्यामुळे वयाच्या चाळिशीनंतर तीन महिन्यातून एकदा रक्तदाब मोजणे आवश्यक असते. रक्तदाब १४०/९०च्या मर्यादेपेक्षा जास्त असेल तर ते धोक्याचे लक्षण ठरते. काहींमध्ये डोकेदुखी, चक्कर येणे, हृदयाचे ठोके वाढणे, धाप लागणे, स्नायू झटकणे किंवा अंधुक दिसणे ही लक्षणेसुद्धा दिसून येतात. काही प्रकरणांमध्ये, नाकातून रक्तदेखील येऊ शकते.
-महिलांमध्ये उच्च रक्तदाबाची गंभीर लक्षणे?
महिला आणि पुरुषांमध्ये गंभीर लक्षणे सारखीच असतात. कधीकधी स्त्रियांना मेंदूत गुठळ्या झाल्यामुळे पक्षाघात किंवा ब्रेन हेमरेज होऊ शकतो. काही स्त्रियांना दम लागणे किंवा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. उच्च रक्तदाबाचे हे पहिले लक्षण असू शकते. काहींच्या चेहऱ्यावर किंवा पायांवर सूज येऊ शकते आणि हे मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे होऊ शकते.
- तरुणींमधील उच्च रक्तदाब?
लठ्ठपणा, उच्च रक्तातील ग्लुकोज आणि उच्च कोलेस्टेरॉल हे प्रत्यक्षात ‘मेटाबॉलिक सिंड्रोम’चा एक भाग आहे. काही मुली किंवा तरुणींना उच्च रक्तदाब होऊ शकतो. यासोबतच ‘फॅटी लिव्हर’ किंवा ‘पॉलीसिस्टिक ओवेरियन डिसीज’ (पीसीओडी) सुद्धा दिसून येऊ शकतो. पहिल्या गर्भधारणेदरम्यान उच्च रक्तदाब काही नवीन नाही. ‘पीसीओडी’चा बळी ठरलेल्या, जास्त वजन असलेल्या स्त्रियांमध्ये किंवा गर्भधारणेदरम्यान मधुमेह असलेल्या महिलांमध्ये ही सामान्य बाब आहे. ‘प्रीक्लेम्पसि’या सारख्या गर्भधारणेच्या समस्या उच्च रक्तदाबामुळे दिसून येऊ शकतात. यामुळे लघवीमधून प्रथिने जाणे किंवा मूत्रपिंड किंवा यकृताला नुकसान होऊ शकते. उपचार न केल्यास महिलेला आणि पोटातील बाळासाठी घातक ठरू शकते. गर्भनिरोधक गोळ्यांमुळे काही महिलांमध्ये उच्च रक्तदाबाची समस्या होऊ शकतो.
-औषधांशिवाय उच्च रक्तदाबावर उपचार?
औषधांशिवाय स्त्रियांमध्ये उच्च रक्तदाबावर उपचार म्हणजे, रजोनिवृत्तीनंतर मीठ कमी घेणे फायदेशीर ठरू शकते. ज्या स्त्रियांना मध्यम वयात वजन वाढण्याची शक्यता असते त्यांना मोठ्या वयात वजन कमी केल्याने फायदा होऊ शकतो. ‘डॅश डायट’मुळे अनेक महिलांचा रक्तदाब नियंत्रणात आल्याचे दिसून आले. दारूच्या व्यसनाला दूर ठेवल्यानेही फायदा होतो. एरोबिक्स आणि इतर व्यायाम रक्तदाब कमी करण्यासाठीदेखील उपयुक्त ठरतात. ‘कार्डिओवेस्कुलर फिटनेस’चा वेगळा फायदा होतो.
-औषधांनी महिलांचा उपचार करण्याचा मार्ग कोणता?
आतापर्यंत असे कोणतेही औषध विकसित झाले नाही ज्यामुळे लिंगाचा आधारावर फायदा होईल. ‘डाययूरेटिक थेरपी’मुळे लघवीतून कॅल्शियम उत्सर्जन कमी करता येते. ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होतो. ‘अँटीहायपरटेन्सिव्ह’ उपचारांमुळे पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक दुष्परिणाम होतात. महिलांमध्ये स्ट्रोक टाळण्यासाठी ‘कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स’चा वापर फायदेशीर ठरू शकतो.
-गर्भवती महिलांनी कोणती औषधे टाळावीत?
‘एसीई इनहिबिटर्स’, ‘अँजियोटेन्सिन रिसेप्टर्स ब्लॉकर्स’, ‘डायरेक्ट रेनिन इनहिबिटर्स’ आणि ‘मिनरलॉर्टिकॉइड इनहिबिटर्स’ टाळायला हवेत. यामुळे जन्माला येणाऱ्या बाळामध्ये असामान्यतेचा धोका असतो.
- गरोदरपणात उच्च रक्तदाबाचे काय परिणाम होतात?
ताज्या आकडेवारीवरून असे दिसून येते की, उच्च रक्तदाब असलेल्या महिलांना अल्झायमर रोग, डायबिटीज मेलिटस, इस्केमिक हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोक्याची जोखीम वाढते.