लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निसर्ग हा प्रत्येक आजारावर उपचार आहे. त्यासाठी संयम व चिकित्सकवृत्ती आवश्यक आहे. पण मानवीय मानसिकतेवर मॉडर्न मेडिसीनच्या झालेल्या प्रभावामुळे आरोग्याच्या बाबतीत आपण निसर्गापासून दूर होत आहोत. मॉडर्न मेडिसीनची मानसिकता बदलविण्यासाठी आरोग्य भारती गेल्या १० वर्षांपासून नागपुरात कार्यरत आहे. पारंपरिक आणि आरोग्यवर्धक वनस्पतीचा प्रचार, प्रसार आरोग्य भारतीतर्फे सुरू आहे.‘स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम् ’ हे ब्रीद आरोग्य भारतीचे आहे. आरोग्य भारतीतर्फे ज्या ११ वनस्पतींचा प्रचार-प्रसार करण्यात येतो, त्या वनस्पती घरी लावल्यास रोगमुक्त व्यक्ती, कुटुंब आणि समाज होऊ शकतो. वातावरणामुळे पसरणारे साथीचे आजार झाल्यास, डॉक्टरांची गरज भासणार नाही, याचे प्रबोधन घराघरात, झोपडपट्ट्यांमध्ये, वस्त्यांमध्ये शिबिराच्या माध्यमातून आरोग्य भारती करते. शहरात आरोग्य भारतीचे ५० च्या वर सक्रिय कार्यकर्ते आहेत. यात सर्वच पॅथीचे डॉक्टरसुद्धा आहेत. या डॉक्टरांच्या मार्गदर्शनातून गुळवेल, अश्वगंधा, अगस्त्य, भूम्यामलकी, गवती चहा, ब्राह्मी, कोरपड, हेटी, प्राजक्त, शतावरी आणि तुळशी अशा ११ वनस्पतींचा प्रचार करण्यात येतो.झोपडपट्ट्यांमध्ये त्यासंदर्भात छोटी छोटी शिबिरे घेऊन मार्गदर्शन करण्यात येते. त्यांना वनस्पती उपलब्ध करून देण्यात येतात. प्रत्येक वनस्पतीतील औषधी गुणांची माहिती देण्यात येते. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना या वनस्पतीसंदर्भात माहिती देण्यात येते. शहरातील ४० हजार कुटुंब आज आरोग्य भारतीशी जुळलेले आहेत. आरोग्य भारतीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. रमेश गौतम, शहराचे अध्यक्ष डॉ. अनिरुद्ध मुरार, सचिव अशोक गव्हाणे, कोषाध्यक्ष रवींद्र बडगे यांच्या माध्यमातून आरोग्य भारतीचे काम सुरू आहे.
आजाराचा उद्रेक होताच पोहचते आरोग्य भारतीशहरात ज्या भागात साथीच्या आजाराचा उद्रेक होतो त्या भागातील नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी आरोग्य भारतीची चमू त्या भागात पोहचते. वनस्पतीच्या प्रचारासोबतच उपचाराची माहिती देते. अशा अनेक वस्त्यांमध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये आरोग्य भारती पोहोचली आहे.आजार होण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाय कराभारतीय चिकित्सा पद्धतींकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. वस्तुत: आयुर्वेदासारख्या चिकित्सा पद्धतींच्या आधारे प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे सहज शक्य आहे. साध्या साध्या गुळवेल, आवळ्यातून डेंग्यू, स्वाईन फ्लूसारखे आजार सहज दूर ठेवता येतात. याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे जीवनाचा दर्जा खालावला आहे. त्यासाठीच आरोग्य भारतीच्या वतीने ‘प्रतिबंधात्मक आरोग्य’ ही संकल्पना रुजविण्याचा प्रयत्न होतो आहे. व्यक्ती आजारी पडूच नये यासाठी आरोग्य भारती समाजात काम करतेय. जेव्हा समाज सुदृढ राहील तेव्हाच राष्ट्र सुदृढ होईल, असा आरोग्य भारतीचा दृष्टिकोन आहे.रवींद्र बडगे, कोषाध्यक्ष, आरोग्य भारती