लाेकमत न्यूज नेटवर्क
वाडी : शहरात व लगतच्या गावांमध्ये काेराेना संक्रमण वेगाने वाढत आहे. त्यातच शासकीय आराेग्य व्यवस्था काेलमडल्यागत झाली असून, खासगी आराेग्य सेवा महागली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक हतबल झाले आहेत. काेराेना संक्रमित रुग्णांवर कुणाचाही अंकुश नसल्याने त्यांचा मुक्तसंचार संक्रमणास कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे शहरात स्वतंत्र विलगीकरण कक्ष उभारण्याची मागणीही राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्याकडे केली आहे.
वाडी शहराची लाेकसंख्या एक लाखाच्या आसपास आहे. त्यातच शहरात काही काेराेना रुग्णांचा मुक्तसंचार सुरू असल्याने रुग्णांमध्ये वाढ हाेत आहे. शहरात प्रभावी शासकीय वैद्यकीय सेवा नसल्याने सामान्य नागरिकांना काेराेनावर उपचार करवून घेण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. वाडी शहरात शासकीय दवाखाना उभारण्याची गरज असताना त्याकडे आजवर कुणीही लक्ष दिले नाही. परिणामी, काेराेना संक्रमण राेखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शहरात विलगीकरण कक्ष तयार करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्यावर प्रशासनाने अद्याप निर्णय घेतला नाही. त्यातच विलगीकरण कक्षाबाबत शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
शहरातील काेराेना संक्रमणाबाबत स्थानिक नेते गंभीर व जागरूक नाहीत. शहरात मार्गदर्शन केंद्राची आवश्यकता असताना स्थानिक नगरपालिका प्रशासन त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. दुसरीकडे, पालिकेचे कर्मचारी जीव धाेक्यात टाकून घराेघरी जाऊन काेराेना संक्रमितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शाेध घेत आहेत. याच कार्यालयातील पालिकेच्या एका कर्मचाऱ्याला काेराेनाची लागण देखील झाली. त्याला जामठी येथील कर्कराेग निदान रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यामुळे शहरात काेविड केअर सेंटर आणि विलगीकरण कक्षाची निर्मित करावी, अशी मागणी केली जात आहे.
...
प्राथमिक आराेग्य केंद्रावर मदार
वाडी शहरातील आराेग्य व्यवस्थेची संपूर्ण मदार ही व्याहाड (पेठ) येथील प्राथमिक आराेग्य केंद्रावर अवलंबून आहे. या आराेग्य केंद्राने स्थानिक नगरपरिषद प्रशासनाच्या मदतीने जिल्हा परिषद शाळा क्रमांक-१ व दत्तवाडी येथील गुरुदत्त सभागृहात काेराेना चाचणी केंद्र सुरू केले आहेत. काेराेना संक्रमण वाढल्याने या दाेन्ही केंद्रांवर चाचणी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचे प्रमाणही वाढले आहे.
...
दाेन चाचणी केंद्रे
शहरात दाेन घराआड काेराेनाचे रुग्ण आढळून येत असल्याने खासगी हाॅस्पिटलमध्येही बेड उपलब्ध नाहीत. विशेष म्हणजे, शहरात एकमेव काेविड हाॅस्पिटल असून, तिथेही ऑक्सिजनची सुविधा मर्यादित आहे. आठवा मैल येथील एका हॉस्पिटलला कोविड उपचार केंद्र म्हणून प्रशासनाने मान्यता दिली आहे. तिथेही बेड उपलब्ध नाहीत. परिणामी, ऑक्सिजन लेव्हल कमी झालेल्या रुग्णांना नागपूरला न्यावे लागत असून, नागपूर शहरातील शासकीय व खासगी हाॅस्पिटलमध्ये बेड मिळेलच याची खात्री नाही.